नवी दिल्ली : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (०७ ऑगस्ट) पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. त्यांनी महाराष्ट्र निवडणुकीच्या आकडेवारीचा दाखला देत आरोप केला की, राज्य विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर गडबड करण्यात आली. त्यांनी हेही सांगितले की, गेल्या पाच महिन्यांत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अधिक मतदारांची नोंदणी झाली आहे.विधानसभा निवडणुकीत ४० लाख मतदार रहस्यमय पद्धतीने जोडले गेले, ज्यामुळे संशय अधिक वाढला आहे.
एका पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “महाराष्ट्रात आम्ही निवडणूक आयोगाला सार्वजनिकपणे सांगितले की केवळ पाच महिन्यांत पाच वर्षांपेक्षा जास्त मतदार जोडले गेले, ज्यामुळे संशय निर्माण झाला. नवीन मतदारांची संख्या ही महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा अधिक झाली, जे फारच आश्चर्यकारक आहे.” ते पुढे म्हणाले, “पाच वर्षांनंतर अचानक मतदानात मोठी वाढ झाली, विशेषतः संध्याकाळी पाच नंतर मोठा टर्नआउट झाला आणि हे सगळ्यांनी पाहिलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आमचं आघाडीचं गठबंधन साफ पराभूत झालं, तर काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत याच गठबंधनने मोठा विजय मिळवला होता.
हेही अत्यंत संशयास्पद आहे.” राहुल गांधी म्हणाले, “महाराष्ट्रात राज्य पातळीवर आम्ही पाहिलं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये तब्बल १ कोटी नवीन मतदार जोडले गेले. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाशी संपर्क साधला. मी संसदेत हे मुद्दे उपस्थित केले. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली, पण कोणतंही उत्तर मिळालं नाही.” त्यांनी म्हणलं कि, निवडणूक आयोग आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा का देत नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे वारंवार आकडेवारीची मागणी केली आहे. मात्र आम्हाला ती दिली गेली नाही. एवढंच नाही तर निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर देण्यास नकार दिला आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. या मतदार यादीबाबत निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे.
हे मतदार खरे आहेत की खोटे हे निवडणूक आयोगाने सांगितले पाहिजे, असंहि त्यांनी म्हणलं आहे. पुढे राहुल गांधी म्हणाले, “तेव्हा मी एक लेख लिहिला जो अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून आला. त्यामध्ये आमच्या युक्तिवादाचा सारांश मांडला होता. आमचं ठाम मत आहे की महाराष्ट्र निवडणुकीत धांधळी झाली आहे. आणि जेव्हा हा लेख प्रसिद्ध झाला, तेव्हा त्यानं एकच खळबळ उडवून दिली.”