– अभ्यास समिती गठीत करण्याचे निर्देश
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आमच्यासाठी लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, असे म्हणत कबुतरांना अन्न-पाणी देण्यावरील बंदी पुन्हा कायम ठेवली आहे. दरम्यान आजच्या सुनावणीत कबुतरखान्यांसंदर्भात राज्य शासनाने एक अभ्यास समिती गठीत करावी. तसेच कबुतरखान्यांसाठी पर्यायी जागेचा विचारही केला जाऊ शकतो, असे निर्देशही दिले आहेत. यामुळे कबुतरप्रेमींसाठी निराशादायक बातमी आहे. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांमुळे न्यायालयाने कबुतरखान्यांवर बंदी आणली आहे. विधानाने प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. काही विशिष्ट लोकांच्या मागणीमुळे जर कबुतरांना धान्य टाकले जात असेल, तर अत्यंत चुकीचे आहे. कबुतरखान्यांजवळ हजारो लोक राहतात. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असे परखड मतही उच्च न्यायालयाने नोंदवले. या संदर्भातील पुढील सुनावणी बुधवारी होणार असून त्यावेळी महाअधिवक्त्यांना हजर राहण्याच्या सूचना न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्यात आले. मात्र काही समुदायांनी त्याला विरोध केला. जैन समाजानं आंदोलन करत दादरमध्ये ताडपत्री फाडली. कबुतरखान्यांमध्ये धान्य टाकत न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवले. याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. मुंबईतील कबुतरखाने वाचविण्यासाठी धार्मिक महत्त्व जाणून जैन समाजाने लढा पुकरल्यानंतर या मुद्द्याला राजकीय वळण लागलेले आहे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी घातली होती. परंतु कबुतरखाने लगेच बंद करणे योग्य नसल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजाच्या आक्रमक भूमिकेनंतर घेतली. मात्र गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचा असल्याचे सांगत बंदी कायम ठेवली.
मुंबई महापालिकेने रुग्णालयाचा डेटा (माहिती) न्यायालयात सादर करणे अपेक्षित होते. मात्र केवळ एक ते दोन रुग्णालयांची माहिती महापालिकेने न्यायालयासमोर ठेवली, याविषयी देखील न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. यावेळी कबुतरांवरील विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांसंदर्भात डॉ. राजन यांची निरीक्षणे देखील वाचून दाखविण्यात आली. अखेर नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे न्यायालयाचे कर्तव्य असल्याचे सांगत राज्य सरकारने कबुतरखान्यांसंदर्भात अभ्यास समिती गठीत करावी, अशी सूचना करण्यात आली.
कबुतरांमुळे श्वसनाचे आजार बळावतात. अॅलर्जी, अस्थमा होण्याची शक्यता असते. कबुतरांची विष्ठा आणि पंखामुळे आजार होतात. विष्ठेत अस्परजिलस बुरशी असते. ही बुरशी श्वसनातून शरीरात गेल्यास आजाराचा धोका संभवतो. हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया, श्वसन नलिकेला सूज, फुफ्फुसांना सूज येण्याची शक्यता असते. कबुरतखान्याच्या ठिकाणी अन्न टाकल्यास 500 रुपये दंड राज्य सरकारकडून घेण्यात येणार आहे. श्वसनाचे आजार बळावत असल्यानं त्यांना खाणं टाकू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.