बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, रविवारी कर्नाटकच्या दौर्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी केएसआर रेल्वे स्टेशनवरून तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.त्याचबरोबर पंतप्रधानांनी बंगळुरू मेट्रो फेज-२ मार्गाचं देखील उद्घाटन केलं. पंतप्रधानांनी ज्यांना हिरवा झेंडा दाखवला त्या तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये बंगळुरू ते बेळगाव, अमृतसर ते श्री माता वैष्णो देवी कटरा आणि नागपूर (अजनी) ते पुणे या मार्गांवरील गाड्यांचा समावेश आहे. या हाय-स्पीड गाड्या प्रादेशिक संपर्कात लक्षणीय वाढ करतील, प्रवासाचा कालावधी कमी करतील आणि प्रवाशांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव मिळवून देतील.
बंगळुरू मेट्रो फेज-२ प्रकल्पाअंतर्गत आर.व्ही. रोड (रागीगुड्डा) ते बोम्मासंद्रा अशी येलो लाइन तयार करण्यात येत आहे. या लाईनची लांबी १९ किलोमीटरहून अधिक आहे आणि यामध्ये १६ स्थानके असतील. या प्रकल्पावर अंदाजे ७,१६० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. ही येलो लाइन सुरू झाल्यानंतर, बेंगळुरूतील मेट्रोचे एकूण ऑपरेशनल नेटवर्क ९६ किलोमीटरहून अधिक होईल, जे या परिसरातील मोठ्या लोकसंख्येसाठी एक मोठी सुविधा ठरेल.