भोपाळ : ‘आम्ही पहलगाम हल्ल्लाला चोख प्रत्युत्तर दिले.आम्ही जगाला संदेश दिला की, आम्ही कोणाला छेडत नाही, पण जर कोणी आम्हाला छेडले, तर आम्ही त्याला सोडत नाही. आम्ही धर्म विचारून नाही मारत, आम्ही कर्म पाहून मारतो, असे राजनाथ सिंह यांनी आज, रविवारी मध्य प्रदेशातील रायसेन येथील कार्यक्रमात सांगितले. संरक्षण मंत्री राजनात सिंह यांनी आज (दि.१०) मध्य प्रदेशात बीईएमएल रेल्वे कारखान्याची पायाभरणी केली. यावेळी आयोजित सभेतून ऑपरेशन सिंदूरवर महत्वाचे भाष्य करत रक्षामंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निरपराध लोकांची हत्या केली होती, आणि भारताने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. पहलगाममध्ये धर्म विचारून लोकांना मारले गेले, पण आपण धर्म विचारून मारत नाही, कर्म पाहून कारवाई करतो.
अमेरिकेचे नाव न घेता त्यांनी म्हटले की काही लोकांना भारताचा विकास आवडत नाही. काही लोक असे प्रयत्न करत आहेत की भारतीयांच्या हातून तयार होणाऱ्या वस्तू महाग होतील, जेणेकरून जग त्या विकत घेणार नाही. पण जगातली कोणतीही ताकद भारताला एक मोठी अर्थव्यवस्था होण्यापासून रोखू शकत नाही. भारताने आजपर्यंत कोणावर डोळा वटारून आक्रमण केले नाही. आपण सगळ्यांचे कल्याण इच्छितो.
पुढे ते म्हणाले, आज आपण भारतात असे शस्त्रास्त्र तयार करत आहोत, जी आपण पूर्वी परदेशातून खरेदी करत होतो. जर आपण शस्त्रास्त्रांच्या विक्रीबद्दल बोललो, तर आज भारताचा संरक्षण निर्यात २४,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, जो स्वतःतच एक विक्रम आहे. राजनाथ सिंह म्हणाले की २०१४ मध्ये आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले, तेव्हा त्यांच्या दूरदृष्टीमुळे आपण ठरवले की भारत आता संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल. आज आपण पाहतोय की आपण केवळ स्वतःच्या पायावर उभे राहत नाही आहोत, तर संरक्षण क्षेत्रात आपली मुळे घट्ट रोवून आहोत.
भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये संरक्षण क्षेत्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हे क्षेत्र केवळ भारताच्या सुरक्षेला बळकट करत नाही, तर स्वतःच्या वाढीसोबत अर्थव्यवस्थेच्या विकासातही मोठे योगदान देत आहे. रक्षामंत्री म्हणाले की बीईएमएल ने बनवलेले वंदे भारत रेल्वे कोच आज भारताच्या वाहतूक व्यवस्थेला एक नवीन गती देत आहेत. येत्या काळात बुलेट ट्रेनचे डब्बे देखील इथे तयार केले जातील. या क्षेत्राला अजून गती दिली जाईल. मला पूर्ण विश्वास आहे की भविष्यात बीईएमएल भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल.
आज ज्या रेल्वे कोच फॅक्टरीचे भूमिपूजन झाले आहे, त्याचे नाव ‘ब्रह्मा’ ठेवण्यात आले आहे. आपल्या संस्कृतीत ब्रह्मदेव हे निर्माणाशी संबंधित मानले जातात. आपली मान्यता आहे की सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवांनी केली, त्यामुळे आदिकर्त्याच्या नावावर ही युनिटचे नाव ठेवणे ही एक उत्तम कल्पना आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ही युनिट आपल्या नावाची प्रेरणा घेऊन, उत्पादनाच्या क्षेत्रात नवनवीन शिखरे गाठेल.