१८ ऑगस्टला तलवार मुंबईत दाखल होणार
मुंबई : नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. सोमवारी १८ ऑगस्ट रोजी ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.
ऐतिहासिक दस्तऐवज असलेली ही तलवार लिलावात निघाल्याची बातमी २८ एप्रिल २०२५ रोजी कळाली. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांना ही बातमी कळताच त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन ही तलवार शासनाला मिळावी, या दृष्टीने नियोजन करण्यात आले. दूतावासाशी संपर्क करुन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री ॲड.शेलार यांनी याबाबतचे नियोजन व संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मंत्री ॲड.शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा करुन या लिलावात शासनाने सहभाग घेतला व लिलाव जिंकला.
महाराष्ट्र शासनातर्फे ज्या मध्यस्थीने हा लिलाव जिंकला होता, त्यांना लंडन येथे प्रत्यक्ष भेटून त्याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करुन आज मंत्री ॲड.शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली. अशा प्रकारे परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळवण्याची ही पहिलीच वेळ असून अनेक पराक्रमांची साक्षीदार असलेली ही ऐतिहासिक तलवार आपल्या ताब्यात घेण्याचे भाग्य मला लाभले. तमाम महाराष्ट्राचा हा एक ऐतहासिक विजय आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
ही तलवार ताब्यात घेतांना लंडन येथील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या घटनेचा आनंद जल्लोष करुन साजरा केला. या दौऱ्यात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी सहभागी झाले आहेत.
दरम्यान, सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन ही तलवार सोमवारी, १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे दाखल होईल. त्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढून वाजतगाजत ही तलवार दादरच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकदमीमध्ये अणली जाणार आहे. तर याच दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत “गड गर्जना” हा कार्यक्रम होणार आहे.
महाराष्ट्र शासनास मिळालेल्या या यशाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या नावाने एक इतिहास नोंद होईल, असा हा आनंदाचा क्षण आहे, अशी भावना मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.