चंदीगड : पंजाब पोलिसांनी मंगळवारी(दि.१२) पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंधित बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंध असलेल्या ५ जणांना राजस्थानमधून ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत जखमी झाला. पंजाबचे पोलिस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी सोशल मीडिया एक्सवर या ऑपरेशनची माहिती दिली. पोलिस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी सांगितले की, आरोपी पाकिस्तानस्थित ऑपरेटिव्ह हरविंदर रिंडा याच्या निर्देशांवर काम करायचे.
पकड्ण्यात आलेले दहशतवादी स्वातंत्र्यदिनी शहीद भगतसिंग नगर आणि पंजाबमधील इतर ठिकाणी हल्ल्याची योजना आखत होते. त्यांनी सांगितले की, “पाकिस्तानातील आयएसआय समर्थित दहशतवादी नेटवर्कविरुद्ध एक मोठे यश मिळवताना, काउंटर इंटेलिजेंसच्या पथकाने पाकिस्तानस्थित ऑपरेटिव्ह हरविंदर रिंडा याच्या निर्देशानुसार परदेशातील हँडलर मन्नू अगवान, गोपी नवशेहरिया आणि झीशान अख्तर यांनी चालवलेले दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त केले. या अंतर्गत राजस्थानमधील टोंक आणि जयपूर जिल्ह्यातून पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि पुढील नियोजित हल्ले यशस्वीरित्या रोखण्यात आले. दरम्यान, आरोपींना पकडताना चकमक झाली, ज्यात एका आरोपीच्या पायाला गोळी लागली. त्याला एसबीएस नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या दहशतवाद्यांच्या ताब्यातून एक ८६ पी हँड ग्रेनेड, एक .३० बोर पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. आरोपींविरोधात बीएनएस आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या मॉड्यूलने अलीकडेच एसबीएस नगरमधील एका दारू दुकानात हल्ला करण्याची योजना आखली होती. तसेच, स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठे हल्ले करण्याच्या प्रयत्नात होते. अटक केलेल्या आरोपींना परदेशातील झीशान अख्तर आणि बीकेआयचा मास्टरमाइंड मन्नू अगवान याच्याकडून थेट सूचना मिळत होत्या. हे पाकिस्तानस्थित बीकेआय ऑपरेटिव्ह हरविंदर रिंडा याच्यासोबत काम करतात.