रायपूर : छत्तीसगडच्या कोंडागांव जिल्ह्यातील केशकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नालाझारच्या जंगलात काल उशिरा झालेल्या चकमकीत एक ग्रामस्थ जखमी झाला असून नक्षलवादी झाडांची आड घेऊन फरार झाले. सुरक्षा दलांनी केलेल्या तपासणीत काही शस्त्रे, नक्षलवादी साहित्य आणि औषधे जप्त करण्यात आली आहेत. कोंडागांवचे पोलीस अधीक्षक यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
कोंडागांव जिल्ह्यातील केशकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळताच कोंडागांव पोलीस अधीक्षकांनी नक्षलविरोधी मोहिमेचे नियोजन करून त्यांच्या अटकेसाठी बस्तर फायटर्स आणि डीआरजीची संयुक्त पथक रवाना केली होती. रात्री सुमारे ११ वाजता नालाझारच्या जंगलात पूर्वनियोजितपणे दबा धरून बसलेल्या सुमारे १०-१२ अज्ञात सशस्त्र नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. त्यावर आत्मरक्षार्थ बस्तर फायटर्स-डीआरजीच्या संयुक्त पथकाने प्रत्युत्तरात गोळीबार केला. जवानांचा जोर वाढत असल्याचे पाहून नक्षलवादी दाट जंगलात झाडांची आड घेऊन पसार झाले.
घटनास्थळाची कसून तपासणी केल्यावर २ नग भरमार बंदूक, वर्दी, नक्षलवादी साहित्य, औषधे जप्त करण्यात आली. या घटनेत एक ग्रामस्थ जखमी अवस्थेत आढळून आला. गस्त पथकाने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. कोंडागावचे पोलीस अधीक्षक वाय. अक्षय कुमार यांनी चकमकीची पुष्टी देत सांगितले की परिसरात नक्षलवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे.