पुणे : “मी लढत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं ही अपेक्षा चुकीची आहे,” अशी ठाम प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पुण्यात झळकलेल्या फ्लेक्सवर व्यक्त केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी झाल्याचा आरोप केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून, त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील पाषाण परिसरात अण्णांना लक्ष्य करणारे फ्लेक्स लागले आहेत.
अण्णा म्हणाले, “मी दहा कायदे आणले, मात्र ९० वर्षानंतर देखील मी लढत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं ही अपेक्षा चुकीची आहे. अण्णांनी जे कार्य केलं ते आपण करावं असं तरुण युवकांना वाटलं पाहिजे. देशाचे नागरिक म्हणून आपलं काही कर्तव्य आहे की नाही हे प्रत्येकाने विचारावं. काल स्वातंत्र्यदिन साजरा केला, पण नुसता तिरंगा हातात घेऊन होणार नाही, बोट दाखवून काहीही होणार नाही. मी मोठ्या आशेने तरुणाकडे पाहतोय. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे, ती जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही. मात्र एवढी वर्ष लढून कायदे करून जेव्हा कानावर येतं की अण्णांनी जागं झालं पाहिजे, तेव्हा वाईट वाटतं.”