नवी दिल्ली : डोक्यावर संविधान ठेवून नाचणाऱ्यांनीच संविधान पायदळी तुडवले होते”, असे विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. ते आज, रविवारी दिल्लीतील रोहिणीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी एक धक्कादायक खुलासाही केला की, दिल्लीत पूर्वी असा एक कायदा लागू होता, ज्यामुळे कोणताही सफाई कर्मचारी पूर्वसूचना न देता कामावर गैरहजर राहिला तर त्याला थेट तुरुंगात पाठवण्याची मुभा होती.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “जे लोक डोक्यावर संविधान ठेवून नाचतात, त्यांनी संविधानाला कसं पायदळी तुडवलं, बाबासाहेब आंबेडकरांच्या भावना कशा दगावल्या, ही खरी गोष्ट मी आज सांगणार आहे.” ते पुढे म्हणाले, “सफाई कर्मचारी बंधू-भगिनींसाठी दिल्लीत पूर्वी एक अत्यंत धोकादायक कायदा होता. दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्यात असं लिहिलं होतं की, जर एखादा सफाई मित्र कोणतीही सूचना न देता कामावर गेला नाही, तर त्याला एका महिन्याकरता तुरुंगात टाकता येईल. स्वतः विचार करा, सफाई कर्मचाऱ्यांना हे लोक काय समजत होते? एखाद्या छोट्याशा चुकेमुळे तुम्ही त्यांना तुरुंगात टाकणार का?”
“आज जे सामाजिक न्यायाच्या गगनभेदी घोषणा देतात, त्याच लोकांनी देशात असे अनेक कायदे कायम ठेवले होते. पण हा मोदी आहे, जो असे चुकीचे कायदे शोधून-शोधून रद्द करत आहे,” असंही मोदींनी स्पष्ट केलं. “आमच्या सरकारने आतापर्यंत अशा शेकडो जुनाट आणि अन्यायकारक कायद्यांचा अंत केला आहे आणि हा मोहीम अजूनही सुरू आहे.” पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात शासन-सुधारणांवर भर दिला आणि सांगितले की, “आमच्यासाठी सुधारणा (रिफॉर्म) म्हणजे सुशासनाचा विस्तार. त्यामुळेच आम्ही रिफॉर्मवर विशेष भर देत आहोत. आगामी काळात आम्ही मोठ्या प्रमाणावर रिफॉर्म करणार आहोत, जेणेकरून नागरिकांचे आयुष्य आणि उद्योग-व्यवसाय अधिक सुलभ होतील.”
पंतप्रधानांनी सांगितले की, याच दिशेने पुढील मोठे पाऊल म्हणजे जीएसटी सुधारणा असणार आहे. “ जीएसटी सुधारणा होणार आहे. या दिवाळीत देशवासीयांना डबल बोनस मिळणार आहे. याचे प्रारूप आम्ही राज्यांना पाठवले आहे. अशी अपेक्षा आहे की सर्व राज्ये यामध्ये सहकार्य करतील आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल, जेणेकरून यंदाची दिवाळी आणखी भव्यदिव्य होईल,” असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.