कोलकाता : चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटावरील वाद अधिकच तीव्र होत चालला आहे. स्वातंत्र्यसैनिक गोपाल मुखर्जी उर्फ गोपाल पठा यांचे नातू संताना मुखर्जी यांनी चित्रपटात त्यांच्या आजोबांच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे वर्णन केल्याचा आरोप करत नवीन एफआयआर दाखल केला आहे. कुटुंबाची परवानगी न घेता गोपाल मुखर्जी यांचे पात्र चित्रपटात समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संताना मुखर्जी यांनी स्पष्ट केले की, त्यांचे आजोबा अनुशीलन समितीचे सदस्य होते. आणि कुस्तीत पारंगत होते. १९४६ च्या दंगली दरम्यान मुस्लिम लीग हिंसाचारापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी शस्त्रे उचलली होती. यापूर्वी जुलैमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यात आणि कोलकाता येथील लेक टाउन पोलीस ठाण्यात चित्रपटाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलाी होती. या चित्रपटात संवेदनशील दृश्ये असू शकतात ज्यामुळे राज्यातील सांप्रदायिक सौहार्दावर परिणाम होऊ शकतो असा आरोप करण्यात आला होता.
विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी ३१ जुलै रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठात या एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. ४ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती जय सेनगुप्ता यांच्या खंडपीठाने या एफआयआरवर अंतरिम स्थगिती दिली होती. ‘द बंगाल फाइल्स’ हा विवेक अग्निहोत्री यांच्या ‘फाइल्स’ ट्रायलॉजीचा तिसरा भाग मानला जातो. यापूर्वी ‘द ताश्कंद फाइल्स’ २०१९ मध्ये आणि वादग्रस्त ‘द काश्मीर फाइल्स’ २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. ममता बॅनर्जी सरकारवर यापूर्वीही चित्रपटांवर बंदी घालण्याचा आरोप करण्यात आला आहे.