नवी दिल्ली : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज, सोमवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. या फोन कॉलदरम्यान पुतिन यांनी अलास्का येथे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीविषयी माहिती दिली. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेन युद्धाच्या शांततामय समाधानाबाबत भारताच्या ठाम भूमिकेची पुन्हा एकदा स्पष्टपणे मांडणी केली. तसेच या संदर्भातील सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले, “माझ्या मित्र अध्यक्ष पुतिन यांचे त्यांच्या फोन कॉलसाठी आणि अलास्का येथे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या अलीकडील भेटीबाबत माहिती शेअर केल्याबद्दल आभार. भारताने युक्रेन संघर्षाच्या शांततामय समाधानाचा सातत्याने आग्रह केला आहे आणि अशा सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. येणाऱ्या काळात आमच्यातील सातत्यपूर्ण संवाद सुरू राहील, अशी मी अपेक्षा करतो.” दोन्ही नेत्यांनी अनेक द्विपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली आणि परस्पर संपर्क कायम ठेवण्यावर सहमती दर्शवली. पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त रणनीतिक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी १५ ऑगस्ट रोजी अलास्का येथे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत युक्रेनमधील युद्धविरामाबाबत चर्चा झाली. मात्र या चर्चेत रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यावर कोणतीही स्पष्ट सहमती होऊ शकली नाही. ही बैठक अशा वेळी झाली जेव्हा अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे ५०% आयात शुल्क (टॅरिफ) लावले होते. भारताने या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला होता आणि अमेरिकेच्या या पावलाला अन्यायकारक आणि असंगत ठरवले होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते की, आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. पण आता पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन यांच्यात झालेल्या संवादातून हे स्पष्ट होते की अमेरिकन टॅरिफच्या विरोधात रशिया भारताच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक वेळा असे म्हणाले आहेत की भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे त्यांनी भारतावर २५% अतिरिक्त टॅरिफ लावले आणि याचा परिणाम दिसून येतो आहे. पुतिन हे या टॅरिफमुळेच चर्चेसाठी तयार झाले, असे ट्रम्प म्हणाले होते.ट्रम्प यांचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे इशारा दिला होता की जर पुतिन आणि ट्रम्प यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली, तर भारताला आणखी जास्त आयात शुल्कासाठी तयार राहावे लागेल. या पार्श्वभूमीवर, अलास्का बैठकीनंतर भारतासाठी त्याच्या सर्वात मोठ्या निर्यात बाजारपेठ असलेल्या अमेरिकेसोबत व्यापार संघर्ष कायम राहू शकतो. तथापि, डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले होते की, “जर मला भारतावर आणखी टॅरिफ लावावे लागले, तर मी नक्की लावेन. पण शक्य आहे की मला तसे करावे लागणारच नाही.”