नवी दिल्ली : भारताचे राजनैतिक प्रयत्न हे देशाच्या अंतर्गत गरजांशी तसेच २०४७ पर्यंत विकसित भारत होण्याच्या उद्दिष्टाशी घनिष्ठपणे जोडलेले असले पाहिजेत. तरुण अधिकाऱ्यांना त्यांनी आवाहन केले की त्यांनी स्वतःकडे केवळ भारताच्या हितांचे संरक्षक म्हणूनच नाही, तर भारताच्या आत्म्याचे राजदूत म्हणूनही पाहिले पाहिजे. असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी सांगितले त्या राष्ट्रपती भवनात भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) च्या २०२४ च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करत होत्या.
राष्ट्रपतींनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे भारतीय परराष्ट्र सेवेत प्रवेशाबद्दल अभिनंदन केले आणि सांगितले की ते आपला प्रवास सुरू करताना जिथेही जातील तिथे भारताच्या सभ्यतागत ज्ञानातील मूल्ये – शांतता, बहुलत्व, अहिंसा आणि संवाद – आपल्या आचरणातून प्रकट करावीत. तसेच प्रत्येक संस्कृतीतील विचार, लोक आणि दृष्टिकोन यांच्याप्रती खुले राहिले पाहिजे. त्यांनी सांगितले की जागतिक संदर्भ झपाट्याने बदलत आहेत. भू-राजनैतिक परिस्थिती, डिजिटल क्रांती, हवामान बदल आणि बहुपक्षीयतेची आव्हाने उभी ठाकली आहेत. अशा वेळी तरुण अधिकाऱ्यांची चपळाई आणि जुळवून घेण्याची क्षमता ही भारताच्या यशाची गुरुकिल्ली असेल.
राष्ट्रपती म्हणाल्या की आज भारत हा जगातील महत्त्वाच्या आव्हानांच्या समाधानाचा अविभाज्य भाग आहे – मग ती जागतिक उत्तर आणि दक्षिण यांच्यातील असमानतेतून निर्माण होणारी समस्यांची बाब असो, सीमापार दहशतवादाचा धोका असो किंवा हवामान बदलाचे परिणाम असोत. भारत हा केवळ जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश नाही तर सतत उदयाला येणारी आर्थिक शक्ती देखील आहे. आपला आवाज महत्त्वाचा आहे. राजनैतिक अधिकारी म्हणून भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी हे भारताचे पहिले रूप असतील, जे जग त्यांच्या शब्दांत, कृतीत आणि मूल्यांत पाहील.राष्ट्रपतींनी आजच्या काळातील सांस्कृतिक कूटनीतीच्या वाढत्या महत्त्वावरही भर दिला. त्यांनी सांगितले की योग, आयुर्वेद, भरड धान्य मिलेट्स (मिलेट्स) यांसोबतच भारताचे संगीत, कला, भाषा आणि आध्यात्मिक परंपरा या जगासमोर अधिक सर्जनशील आणि प्रभावी पद्धतीने सादर केल्या गेल्या पाहिजेत.