नवी दिल्ली : विपक्षाच्या इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार असतील, अशी माहिती कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. बी. सुदर्शन रेड्डी हे भारतातील सर्वाधिक सन्मानित कायदेतज्ज्ञांपैकी एक मानले जातात. ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश राहिले आहेत. याशिवाय, त्यांनी गुवाहाटी आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातही न्यायमूर्ती म्हणून सेवा दिली आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी सांगितले की, विरोधकांच्या इंडिया आघाडीने सर्वानुमते बी. सुदर्शन रेड्डी यांचे नाव निश्चित केले आहे. त्यांचा सामना एनडीए आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्याशी होणार आहे. बी. सुदर्शन रेड्डी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील के. प्रताप रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल आणि संविधानिक प्रकरणांवर वकिली सुरू केली होती. ८ ऑगस्ट १९८८ रोजी त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि ते केंद्र सरकारचे अतिरिक्त स्थायी वकील झाले. ८ जुलै १९४६ रोजी जन्मलेले बी. सुदर्शन रेड्डी हे गोव्याचे पहिले लोकायुक्त देखील राहिले आहेत. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील अकुला मायलारम गावात झाला.
सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून १९७१ मध्ये कायद्याची पदवी (LL.B.) घेतली. १९९३ मध्ये ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातील वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, तसेच उस्मानिया विद्यापीठाचे कायदेशीर सल्लागार म्हणूनही कार्य केले.१२ जानेवारी २००७ रोजी त्यांची सुप्रीम कोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि ८ जुलै २०११ रोजी ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर, मार्च २०१३ मध्ये त्यांनी गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारला. मात्र, ऑक्टोबर २०१३ मध्ये त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला. उपराष्ट्रपती पदासाठी आता राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट सामना होणार आहे, आणि ही निवडणूक देशाच्या राजकीय पटलावर एक महत्त्वाची घटना ठरणार आहे.