मुंबई : महाराष्ट्र “डेटा सेंटर कॅपिटल” आणि “सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल” म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रांत येत असून उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार आहे. यूकेसोबत झालेल्या रणनीतिक करारामुळे नवे दरवाजे उघडले असून भारतात अधिक गुंतवणूक होत आहे. हे गुंतवणूकदारांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे द्योतक आहे. आज विविध गुंतवणुकींसाठी महत्त्वपूर्ण असे आठ सामंजस्य करार (MoUs) आणि दोन रणनीतिक करार करण्यात आले असून, त्यातून राज्यात तब्बल ४२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन २८ हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज मंत्रालयातील समिती कक्षात १० सामंजस्य करारांचे आदानप्रदान करण्यात आले. त्यावेळी ते गुंतवणूकदारांसमोर बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेशुमार, उद्योग सचिव डॉ.पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू, विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह तसेच विविध क्षेत्रातील कंपन्यांचे गुंतवणूकदार उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, गुंतवणूकदारांनी अतिशय ठाम आणि सकारात्मक बांधिलकी दाखवली आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक सुरळीत होण्यासाठी शासनाची संपूर्ण टीम सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्यासोबत काम करेल. याशिवाय हायपरलूप प्रकल्पालाही गती मिळत आता आयआयटी मुंबई व आयआयटी मद्रास यांच्यामुळे हा प्रकल्प पुन्हा पुढे सरकला आहे. हा प्रकल्प लॉजिस्टिक, वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात आमूलाग्र बदल घडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेले ८ सामंजस्य करार आणि २ रणनीतिक करार : सोलर पॅनेल निर्मितीसाठी ज्युपिटर इंटरनॅशनल लि. या कंपनीसोबत १०९०० कोटी रूपयांची गुंतवणूक करार झाला असून यातून ८३०८ रोजगार निर्मिती होणार आहे. रोचक सिस्टिम्स प्रा.लि. या कंपनीसोबत डेटा सेंटर करिता २५०८ कोटी रूपयांचा करार. १ हजार रोजगार निर्मिती. रोव्हिसन टेक हब प्रा.लि. या कंपनीसोबत डेटा सेंटर या सेक्टरकरिता २५६४ कोटी रूपयांची गुंतवणूक करार. ११०० रोजगार निर्मिती. वॉव आयर्न ॲण्ड स्टिल प्रा.लि. यासाठी पोलाद उद्योगाकरिता ४३०० कोटी रूपयांचा करार. १५०० रोजगार निर्मिती. वेबमिंट डिजिटल प्रा.लि. या कंपनीसोबत डेटा सेंटरकरिता ४८८६ कोटी रूपयांचा गुंतवणूक करार. २०२५ रोजगार निर्मिती. औद्योगिक उपकरणे क्षेत्राकरिता ॲटलास्ट कॉपको या कंपनीसोबत ५७५ कोटी रूपयांचा करार. ३४०० रोजगार निर्मिती. हरित उर्जा क्षेत्रात एलएनके ग्रीन एनर्जी या कंपनीसोबत ४७०० कोटी रूपयांचा गुंतवणूक करार. २५०० रोजगार निर्मिती. डेटा सेंटर, लॉजिस्टिक सेंटर रिअल इस्टेट या क्षेत्राकरिता प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट लि.या कंपनीसोबत १२५०० कोटी रूपयांचा गुंतवणूक करार. ८७०० रोजगार निर्मिती. याशिवाय, ग्लोबल इंडिया बिझिनेस कॉरिडॉर तर्फे महाराष्ट्रातील युके व युरोपमधील गुंतवणूक आकर्षिक करण्यासाठी सहकार्य करण्याचा सामंजस्य करार आणि टीयूटीआर हायपरलूम प्रा.लि. कंपनीकडून जेएनपीटी व वाढवण बंदरावर अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासंदर्भात करार करण्यात आला आहे.