मुंबई : मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत असून शहर व उपनगरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विक्रोळी परिसरात तब्बल २५५.५ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. भारतीय हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी करून पुढील २४ तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे.मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची ठाणे-सीएसएमटी दरम्यानची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ठाणे ते कसारा, कर्जत आणि खोपोली दरम्यान शटल सेवा सुरू आहे. तर हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेनही ५५ तास उशीरा धावत आहेत. विक्रोळी, कुर्ला, दादर, चेंबूर, भांडूप, अंधेरी परिसरात रेल्वे रुळ पाण्याखाली गेले असून गाड्या २०-२५ मिनिटे उशिराने धावत आहेत.रस्त्यांवरही पाणी साचल्याने ठाणे-नवी मुंबई-पनवेल मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कळवा येथील विटावा उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे वाहनांच्या रांगा थेट ठाण्यापर्यंत लागल्या.
सततच्या पावसामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली असून कुर्ला-बांद्रा परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विक्रोळी, अंधेरी, घाटकोपर, वडाळा, दादर, कुर्ला परिसर पाण्याखाली गेला असून, कुर्ल्यातील एल.बी.एस. मार्गावर कमरेहून अधिक पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुकानांत पाणी शिरल्याने व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. आज मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय व महानगरपालिका कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ची परवानगी द्यावी, असे निर्देश दिले आहेत. शाळा, महाविद्यालयांना देखील आज सुट्टी देण्यात आली आहे.येत्या काही तासांत ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे सुटण्याची शक्यता वर्तवली आहे. रेल्वे फूटबोर्डवर प्रवास करू नये, पाण्याखालील रुळ ओलांडू नयेत अशा सूचना मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
पावसाची नोंद : मुंबई शहर : फॉर्सबेरी जलाशय १०९ मिमी, दादर जलवाहिन्या कार्यशाळा १०३ मिमी, नायर रुग्णालय ९४ मिमी. पूर्व उपनगरे : मुलुंड १०० मिमी, चेंबूर ९० मिमी, विक्रोळी ८७ मिमी. पश्चिम उपनगरे : चिंचोली १०७ मिमी, वर्सोवा १०६ मिमी, वांद्रे ९५ मिमी. दरम्यान, १८ ऑगस्ट सकाळी ८ ते १९ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस चिंचोलीत ३६१ मिमी, कांदिवलीत ३३७ मिमी आणि दिंडोशी येथे ३०५ मिमी नोंदला गेला होती.
भरती-ओहोटी : आज सकाळी ९:१६ वाजता ३.७५ मीटर भरती, दुपारी ३:१६ वाजता २.२२ मीटर ओहोटी, तर रात्री ८:५३ वाजता ३.१४ मीटर भरती होणार आहे. उद्या मध्यरात्रीनंतर ३:११ वाजता १.०५ मीटर ओहोटी अपेक्षित आहे. मुंबई व उपनगरांतील सततच्या पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.