मंत्री गिरीश महाजन यांचे यंत्रणांना सज्ज व सतर्कतेचे आदेश…..
अनंत नलावडे
मुंबई : आज मंगळवारी अगदी सकाळपासूनच राज्यभरात पडत असलेल्या मुसळधार पावसाने धोक्याची परिस्थिती निर्माण केली आहे.आज पुन्हा भारतीय हवामान विभागाने राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाला अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी थेट मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात दाखल होवून संपूर्ण राज्याच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी महाजन यांनी थेट मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी त्यांनी संवाद साधत मुंबई शहरातील पावसाचे चित्र जाणून घेतले. त्याचवेळी त्यांनी नांदेड आणि रायगड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशीही संपर्क करून तिथल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि “प्रत्येक यंत्रणेने सज्ज राहावे, निष्काळजीपणा अजिबात चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला.
त्यानंतर महाजन यांनी यावेळी उपस्थित असलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले की, “आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवली तर त्वरित मदत पोहोचली पाहिजे, नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचवता आले पाहिजे आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू झाले पाहिजे.”यावेळी मी स्वतः संबंधित यंत्रणांना व अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की,नागरिकांना वेळेवर सतर्कतेचे संदेश पाठवण्याचे, नद्यांची पाणी पातळी लक्षपूर्वक तपासण्याचे आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून “एकही जीव धोक्यात येऊ नये” यासाठी सर्व उपाय तत्काळ करण्याचे आदेश दिले.या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी आणि आपत्कालीन कार्य केंद्राचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी अतिवृष्टीच्या परिस्थितीबाबत सविस्तर माहिती मंत्री महाजन यांना दिली.