मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा कहर; २१ जणांचा मृत्यू

0

मुंबईत विक्रमी पावसाची नोंद

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढले असून पूर आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान २१ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणासह राज्यातील विविध भागांत संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेड जिल्ह्यात पुराचा गंभीर फटका बसला असून आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ मुंबईतच मागील २४ तासांत सुमारे ३०० मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळला असून शहराचा श्वास घोटला आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील १८ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत हसनाळ या गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे आता पर्यंत ५ जणांचा मृत्यू झालेला आहे. तर मुखेड – उदगीर रस्त्यावरील धडकनाळ येथील पुलावरून एक कार आणि एक ऑटोमधील सात जण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. यातील ३ जणांना वाचविण्यात उदगीर अग्निशमन दलाला यश आले असून उर्वरित ४ बेपत्ता जणांपैकी ३ जणांचा मृतदेह सापडले आहेत. चार बेपत्ता व्यक्तींपैकी तीन व्यक्ती मयत झाले असून तिघांचे मृतदेह सापडले आहेत.

पावसाचा जोर कायम राहिल्याने हवामान खात्याने विदर्भासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि कराड तालुक्यातील प्राथमिक शाळा पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर सुमारे ३५० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्याचवेळी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले असून ९३ हजार २०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाला सार्वजनिक सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भाग जलमय झाले होते. पावसाने ‘२६ जुलै २००५’ च्या भीषण पुराची आठवण करून दिली. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून रस्त्यांवर पाणी साचल्याने प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकले. रेल्वे उशिराने चालल्यामुळे स्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. अनेक मुंबईकरांना कार्यालयातून सुट्टी जाहीर झाल्यानंतर पाण्यातून वाट काढत घरी परतावे लागले.

अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, दादर, परळ, वरळी आणि वांद्रे परिसरात पावसाचा जोर सर्वाधिक होता. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, कुलाबा केंद्रात मंगळवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ६३ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ केंद्रात याच कालावधीत १६३.४ मिमी पाऊस झाला. सोमवारी सकाळपासून मंगळवारी सकाळपर्यंत सांताक्रूझ येथे तब्बल २३८.२ मिमी पाऊस नोंदवला गेला. गेल्या चार दिवसांच्या पावसामुळे ऑगस्ट महिन्याची सरासरी पावसाची मर्यादा आधीच पार झाली आहे.

मुंबईतील मोनोरेलमध्ये प्रवासी अडकून पडल्याची घटना सोमवारी रात्री घडली. म्हैसूर कॉलनी आणि चेंबूरदरम्यान ट्रेन (RST-4) थांबल्यामुळे सुमारे ५८२ प्रवासी अडकल्याचे समजते. चार तासांच्या प्रयत्नांनंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, आज मोनोरेल सेवा पुन्हा सुरू झाली असून प्रवासी वाहतूक नियमित मार्गावर आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोशल मीडियाद्वारे नागरिकांना सतर्कतेचा संदेश दिला आहे. मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे सेवा तसेच बेस्ट वाहतूक सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर अविरत कार्यरत असून आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी १९१६ या नियंत्रण कक्ष क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरात झालेल्या विक्रमी पावसाने गेल्या अनेक वर्षांतील सर्व विक्रम मोडले. चिंचोली फायर स्टेशन येथे तब्बल ३६१ मिमी पावसाची नोंद झाली, जी गेल्या २८ वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद मानली जात आहे. यापूर्वी २३ ऑगस्ट १९९७ रोजी सांताक्रूझ येथे ३४६.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. राज्यभर पावसाचा कहर कायम असून पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech