शशांक राव पॅनलचे सर्वाधिक १४, सहकार समृद्धी पॅनलचे ७उमेदवार विजयी
मुंबई : ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. बेस्ट पतपेढीच्या एकूण २१ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत शशांक राव पॅनलचे सर्वाधिक १४ उमेदवार विजयी झाले. तर प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या (महायुती) सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता गमावली आहे. ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता न आल्याने शिवसेना-मनसेची ब्रॅंडच्या अस्तित्वाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर ठाकरे गटाचे एकहाती वर्चस्व होते. मात्र, आता या ठिकाणी शशांक राव पॅनेलची सत्ता आली आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. सुरुवातीला सहकार समृद्धी पॅनेलला नऊ जागांवर विजय मिळाला होता. मात्र, मध्यरात्री पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर शशांक राव पॅनेलच्या आणखी दोन उमेदवारांचा विजय झाला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शशांक राव पॅनलचे विजयी उमेदवार – एकूण १४
१) आंबेकर मिलिंद शामराव, २) आंब्रे संजय तुकाराम, ३) जाधव प्रकाश प्रताप, ४) जाधव शिवाजी विठ्ठलराव, ५) अम्मुंडकर शशिकांत शांताराम, ६) खरमाटे शिवाजी विश्वनाथ, ७) भिसे उज्वल मधुकर, ८) धेंडे मधुसूदन विठ्ठल, ९) कोरे नितीन गजानन, १०) किरात संदीप अशोक, ११) डोंगरे भाग्यश्री रतन (महिला राखीव), १२) धोंगडे प्रभाकर खंडू (अनुसूचित जाती/ जमाती) १३) चांगण किरण रावसाहेब (भटक्या विमुक्त जाती), १४) शिंदे दत्तात्रय बाबुराव (इतर मागासवर्गीय),
प्रसाद लाड यांच्या पॅनेलचे विजयी उमेदवार – एकूण ७
१) रामचंद्र बागवे, २) संतोष बेंद्रे, ३) संतोष चतुर, ४) राजेंद्र गोरे, ५) विजयकुमार कानडे, ६) रोहित केणी (महिला राखीव मतदार संघ), ७) रोहिणी बाईत
ब्रॅण्डला जागा दाखवली – प्रसाद लाड
भाजप नेते प्रसाद लाड यांनी निकालानंतर ट्वीट करून आपला आनंद व्यक्त केला. “ब्रॅण्डचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत, जागा दाखवली” अशा शब्दात त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
पैशांच्या प्रचंड वापरासमोर आम्ही हरलो – सुहास सामंत
ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भाजपने पैशांचा प्रचंड वापर केला. या पैशासमोर आम्ही हरलो, असे मत सुहास सामंत यांनी व्यक्त केले. बेस्ट पतपेढी निवडणूक झाली, त्याचा निकाल काल आला. आम्ही दुर्दैवाने हरलो. जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. गेल्या नऊ वर्षांमध्ये आम्ही बेस्ट पतपेढी ज्या उंचीवर नेऊन ठेवली ती उंची टिकवून ठेवा. बेस्टच्या कर्मचाऱ्यांची सेवा करा, एवढीच विनंती मी करतो, असे सुहास सामंत यांनी म्हटले.
ठाकरे ब्रँड कधीही संपणार नाही – संजय राऊत
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फार बोलण्यास नकार दिला. ही स्थानिक स्तरावरील छोटी निवडणूक आहे. बेस्टमध्ये कोणती युनियन मजबूत आहे, यावर ही गणितं अवलंबून आहेत. ठाकरे ब्रँड हा कधीही संपणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.