मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज (शनिवार) मुंबईतील वांद्रे येथील कार्यालयात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. या भेटीत गणेशोत्सव काळात शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भेटीचे कारण विषद करत माध्यमांना माहिती दिली. अमित ठाकरेंनी शेलारांना निवेदन देत स्पष्ट केले की, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. “या काळात अनेक कुटुंबे गावी जातात. पण विद्यार्थ्यांना परीक्षा असल्यामुळे सणाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांच्या कालावधीत कोणत्याही परीक्षा होऊ नयेत. तसेच आधी निश्चित केलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.
अमित ठाकरे यांनी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास वांद्रे येथील कार्यालयात आशिष शेलार यांची भेट घेतली. गणेशोत्सव कालावधीत शाळा व महाविद्यालय परीक्षा वेळापत्रक तात्पुरते रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी अमित ठाकरेंनी या निमित्ताने केली. अमित ठाकरे यांनी याबाबतचे एक निवेदन आशिष शेलार यांना दिले आहे. २६ तारखेला परीक्षा आहेत. त्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या पाहिजेत. २७ तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. हा महाराष्ट्राचा उत्सव आहे. अनेकाना गावी जायचे असते. परंतु, परीक्षेचा ताणही कायम राहतो. यामुळे परिपत्रक सांस्कृतिक मंत्र्यांमार्फत जावे, असे मला वाटले, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना ठाकरेंनी सांगितले की, आशिष शेलार यांच्या भेटीदरम्यान आमची जी चर्चा झाली, त्यात राजकीय काही झाले नाही. टीका राजकीय होतात, वैयक्तिक होत नाही. त्यामुळे वैयक्तिक दुरावा नाही, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईतील खड्ड्यांबाबत अमित ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, खड्ड्यांबाबत अनेक वर्षे बोलले जाते. याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे राज ठाकरे. एकदा संधी द्या. नाशिकमध्ये तुम्ही पाहिले आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले. आमची एकच मागणी आहे की परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना सण आनंदात साजरा करता येईल.
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे, तर तो प्रत्येक विद्यार्थ्याने मनमोकळेपणाने अनुभवायला हवा. पत्राद्वारे मनसे विद्यार्थी सेनेने इशारा दिला आहे की, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल. तसेच उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सव निमंत्रणाबाबत विचारले असता, “याबाबत तुम्हाला सरप्राईज मिळेल,” असे अमित ठाकरे म्हणाले.
अमित ठाकरेंच्या प्रमुख मागण्या
राज्यातील सर्व शाळा (एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, सीआयएससीई, आयबी, आयजीसीएसई, एमआयईबी, एनआयओएस बोर्ड) व सर्व महाविद्यालयांनी गणेशोत्सव काळात परीक्षा आयोजित करू नयेत. आधी निश्चित केलेल्या परीक्षा तात्काळ रद्द करून पुढे ढकलाव्यात. शासन धोरणाला विरोध करणाऱ्या संस्था/विद्यापीठांवर कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांना गणेशोत्सवात सहभागी होण्याची संधी द्यावी.