बटाला येथून एक दहशतवादी अटक, एक फरार
चंदीगड : पंजाब पोलिसांनी आयएसआय समर्थित दहशतवादी मॉड्यूल उधळून लावत एक आरोपीला अटक केली असून चार हातबॉम्ब तसेच एक आरडीएक्स आधारित आयईडी जप्त केले आहे. पंजाब पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी सोमवारी सांगितले की सीमावर्ती क्षेत्र बटाला येथील पोलिसांनी एक दहशतवाद्याला अटक केली असून त्याचा दुसरा साथीदार फरार आहे. त्यांनी सांगितले की पकडलेला दहशतवादी बब्बर खालसा इंटरनॅशनलचा दहशतवादी निशान सिंह उर्फ निशान जोडिया यांच्या सूचनेवर काम करत होता. निशान सिंह हा पाकिस्तानच्या आयएसआय समर्थित दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा याच्या आदेशावर काम करत आहे.
पोलीस महासंचालकांनी सांगितले की बटाल्याच्या बलपूरा गावातून पोलिसांनी चार हातबॉम्ब, दोन किलोग्राम आरडीएक्सयुक्त एक आयईडी जप्त केला आहे. याशिवाय पोलिसांनी अनेक संचार साधने देखील जप्त केली आहेत. प्राथमिक चौकशीतून असे दिसून आले आहे की ही खेप ब्रिटनस्थित बीकेआय दहशतवादी निशान सिंह उर्फ निशान जोडिया यांच्या सूचनेवर ठेवण्यात आली होती, जो पाकिस्तानच्या आयएसआय समर्थित पाकस्थित दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा यांच्या आदेशावर काम करत होता. पोलीस महासंचालकांच्या मते संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यासाठी चौकशी सुरू आहे.