युक्रेनच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा, झेलेन्स्कींनी मानले आभार

0

किव : युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी (दि.२६) युक्रेनच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी भारताच्या योगदानावर युक्रेनला विश्वास आहे. तसेच, शांतता आणि संवादाच्या प्रति भारताच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले आहे. झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, युक्रेनच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार. आम्ही शांतता आणि संवादासाठी भारताच्या समर्पणाची प्रशंसा करतो.” पुढे त्यांनी लिहिले, “आज, जेव्हा संपूर्ण जग या भीषण युद्धाचा शेवट सन्मानपूर्वक आणि शाश्वत शांततेने करण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा आम्ही भारताच्या योगदानावर विश्वास ठेवतो. राजनैतिक मार्गाने घेतलेला प्रत्येक निर्णय केवळ युरोपमध्येच नव्हे, तर हिंद-प्रशांत क्षेत्रात आणि त्याही पलीकडे सुरक्षितता मजबूत करतो.”

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मिळालेले पत्रही पोस्ट केले, ज्यामध्ये मोदींनी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झेलेन्स्की यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी त्यांचे आभार मानले होते. पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, “भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण दिलेल्या विचारशील शुभेच्छांबद्दल मी आपला आभारी आहे.” तसेच मोदींनी युक्रेनच्या जनतेला त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि गेल्या वर्षी कीव्हला केलेल्या आपल्या भेटीची आठवणही पत्रात नमूद केली. युक्रेनच्या राष्ट्रपतींची ही टिप्पणी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा मॉस्को आणि कीव्हमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला ‘दंडात्मक’ टॅरिफ लवकरच लागू होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech