गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी गुजरातमधील हंसलपूर येथे मारुती सुझुकीच्या पहिल्या जागतिक बॅटरी इलेक्ट्रिक वाहन (बीईडब्ल्यू) ‘ई-विटारा’ला हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच १०० हून अधिक देशांसाठी या वाहनाच्या निर्यातीची औपचारिक सुरुवातही झाली. त्याआधी पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले होते की, ही ऐतिहासिक पहल भारताला हरित (ग्रीन) वाहतुकीच्या जागतिक केंद्र म्हणून उदयास येताना दर्शवते आणि ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांप्रती पंतप्रधानांची बांधिलकी अधोरेखित करते.
या यशामुळे भारत आता सुझुकीच्या इलेक्ट्रिक वाहनांचे जागतिक उत्पादन केंद्र बनेल.मारुती-ई -विटारा ही आधुनिक तंत्रज्ञानाने आणि प्रीमियम सुविधांनी सज्ज आहे. यामध्ये पॅनोरामिक सनरूफ देण्यात आले आहे, जे केबिनला मोकळं आणि हवेशीर बनवते. उन्हाळ्याच्या दिवसांसाठी व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल ही वैशिष्ट्ये ड्रायव्हिंगला अधिक आरामदायक बनवतात. सुरक्षेच्या दृष्टीने ई -विटारा देखील अतिशय सक्षम आहे. यामध्ये ७ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा, ऑटो-होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि लेव्हल २ एडीएएस (ऍडव्हान्स ड्राइवर असिस्टंस सिस्टम) यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ही फीचर्स केवळ चालकच नाही तर प्रवाशांच्या सुरक्षेलाही अधिक बळकटी देतात.