बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात

0

पुणे : ग्रामीण महिलांना औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा’अंतर्गत विविध उपक्रम राबवित आहे. या अंतर्गतच बारामतीतील ३० महिला शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादन दुबईला निर्यात केले असून यामुळे इतर महिलांनाही प्रोत्साहन मिळत आहे.

ग्रामीण महिलांनी कृषी क्षेत्रात नेतृत्व करत आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीतील ३० महिला शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादन दुबईला निर्यात केले. हा उपक्रम ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा’अंतर्गत राबविण्यात आला. या उपक्रमाची अंमलबजावणी संघर्ष क्लस्टर मायक्रो रिसोर्स सेंटर (CMRC), बारामती यांच्या माध्यमातून झाली असून कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच खरेदी व बाजारपेठेसाठी आदी नेचर फूड्स प्रा. लि. यांच्याशी खरेदी हमी करार करण्यात आला.

२२ एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या या शेतीत ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, सेंद्रिय खतांचा वापर व एकात्मिक कीड व्यवस्थापनासारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यात आला. नेदरलँड तंत्रज्ञानावर आधारित उगमशिव मिरचीची रोपेही वापरण्यात आली. एकूण उत्पादनात प्रति महिला सरासरी ६,००० किलो मिरची मिळाली. त्यात स्मिता पवार (७,६९२.५ किलो), रोहिणी जाधव (७,६६७.५ किलो) आणि राणी जामधडे (६,०५२.५ किलो) यांचे विशेष योगदान राहिले.

अनियमित पाऊस, काढणी नंतरची गुणवत्ता व निर्यातीतील आव्हाने यावर मात करण्यासाठी सतत फील्ड मार्गदर्शन, पीक विमा सल्ला व प्रक्रिया प्रशिक्षण दिले गेले. पुढील टप्प्यात उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी स्थळावर ग्रेडिंग युनिट उभारण्याची योजना आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि उद्योजकीय कौशल्य विकसित झाले आहे. ग्रामीण महिला जागतिक कृषी मूल्यसाखळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, हे या प्रयोगातून अधोरेखित झाले आहे. बारामतीचा हा यशस्वी उपक्रम ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक ‘स्केलेबल व रीप्लिकेबल मॉडेल’ ठरत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech