कांदा खरेदीच्या पडताळणीसाठी केंद्रीय पथक नाशिक जिल्ह्यात दाखल

0

लासलगाव : ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या संस्थांनी उद्दिष्टानुसार व निकषांनुसार खरेदी केली आहे का,याबाबतच्या मुद्द्यांची पडताळणी करण्यासाठी केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय अन्न महामंडळाचे पथक गोपनियरीत्या जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकामार्फत पडताळणी होऊन अहवाल सादर केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन्ही संस्थांनी प्रत्येकी १.५ लाख टन कांदा खरेदी केली मात्र खरेदीपश्चात नोंदीच्या तुलनेत उपलब्ध नसलेला साठा,खरेदी केलेल्या कांद्यामध्ये गुणवत्तेचा अभाव याबाबत शंका असल्याने केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या पथकासह भारतीय अन्न महामंडळाचे पथक जिल्ह्यात अचानक दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बोगस काम करणाऱ्या संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. या केंद्रीय पथकाद्वारे पोर्टलनुसार खरेदीपश्चात कांद्याची साठवणूक,कांद्याची स्थिती,दर्जा,आकार व एकूणच गुणवत्ता तपासली जाणार आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून ग्राहक व्यवहार विभागाचे काही प्रतिनिधी पोर्टलनुसार केलेली खरेदी व साठा याचा सर्वसाधारणपणे पाहणी सुरू होती मात्र अशातच पुन्हा दुसरे पथक दाखल झाले आहे.त्यामुळे केंद्र सरकारही यंदा कांदा खरेदीच्या मुद्द्यावर सावध झाल्याचे दिसते. या तपासणीमुळे जिल्ह्यातील कांदा व्यापारात खळबळ उडाली आहे.शेतकरी आणि व्यापारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत,कारण या तपासणीतून दोषी आढळल्यास कठोर कारवाई होऊ शकते.केंद्र व राज्य सरकारचा कांदा खरेदीतील गैरव्यवहार रोखण्याचा प्रयत्न असून केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech