नवी दिल्ली : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात बुधवार २७ ऑगस्ट पासून गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. यंदा गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने उत्सवाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात सकाळी ११:३० वाजता गणपती बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठा होईल. निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वयंसहाय्यता गटांच्या हस्तकौशल्य दालनाची जोड या उत्सवाला मिळणार असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ग्रामीण उद्योजकतेचा संगम अनुभवता येईल. आर विमला यांनी सर्व भक्तगणांना या उत्सवाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
गणेशोत्सव आणि हस्तकौशल्याचा मेळ : २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत चालणाऱ्या हस्तकौशल्य प्रदर्शनात नाशिक, बीड आणि पालघर येथील स्वयंसहाय्यता गट खादी, बटिक, बांधनी, वारली चित्रकला, चामड्याची उत्पादने, दागिने आणि पारंपरिक खाद्यपदार्थ सादर करतील. लाइव्ह किचनमध्ये सुजाता जाधव आणि धनश्री यांचे कोकणी उकडीचे मोदक आणि बटाटा वडे विशेष आकर्षण ठरेल. अमृतवाला महिला गट, सावित्रीबाई फुले गट, विराज खादी उपक्रम, वारली आर्ट समूह, रंजना जाधव, यास्मीन शेख आणि जयप्रकाश सी. हनवंते यांचे खादी उत्पादने येथे लक्ष वेधतील.
आर विमला यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे दालन स्थानिक कलांना राष्ट्रीय व्यासपीठ देईल आणि ग्रामीण उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करेल. हा उपक्रम महाराष्ट्र सदनाला सांस्कृतिक केंद्र बनवेल आणि आर्थिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल, असे आर विमला यांनी सांगितले. सर्वांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी : २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजता प्राणप्रतिष्ठापना आणि सायंकाळी ७ वाजता दिपाली काळे यांचा ‘कलारंग’ कार्यक्रम; २८ ऑगस्ट रोजी देबू मुखर्जी यांचा हिंदी गीतांचा नजराणा; २९ ऑगस्ट रोजी डॉ. पं. संजय गरुड यांचा ‘संतवाणी’; ३० ऑगस्ट रोजी सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद आणि स्थानिक कार्यक्रम; ३१ ऑगस्ट रोजी मराठी-हिंदी नृत्याविष्कार; १ सप्टेंबर रोजी जादू, मिमिक्री आणि संगीत; २ सप्टेंबर रोजी ‘विभावरी’ सिनेसंगीत; ३ सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम; ४ सप्टेंबर रोजी भक्तीरंग; ५ सप्टेंबर रोजी सिद्धेश्वर झांज पथक आणि ६ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक होईल.