मुंबई : कौन बनेगा करोडपती सीझन १७ सध्या प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. या नवीन सीझनमध्ये प्रेरणादायी कथा आणि अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळत आहेत. अलीकडेच या सीझनला आदित्य कुमार निमित्ताने पहिला करोडपती झाला.आता या शुक्रवारी(दि.२९) येणारा भाग आणखी एका खास क्षणासाठी सज्ज आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनच्या निमित्ताने प्रसारित होणाऱ्या या विशेष भागात भारतीय महिला आइस हॉकी संघाचा गौरव करण्यात येणार आहे. या संघाने नुकत्याच पार पडलेल्या आयआयएचएफ आशिया चषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे.
या विशेष भागात संघाच्या सदस्य अमिताभ बच्चन यांच्यासोबत केबीसी सीझन १७ च्या मंचावर सहभागी होतील आणि त्यांनी कशा प्रकारे लडाखच्या बर्फाच्छादित प्रदेशात आव्हानांना सामोरे जात भारताचे नाव उज्वल केले, याची कहाणी उलगडून सांगतील त्यांच्या या यशाने भारावून जाऊन अमिताभ बच्चन म्हणाले, “लडाखसारख्या सुंदर पण कठीण परिसरात आइस हॉकीसारखा खेळ निवडणे सहज शक्य नसते. पण स्त्रिया काही ठरवलं की ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. तुम्ही सगळ्या चॅम्पियन बनून इथे आल्या आहात, हा आमच्यासाठी गर्वाचा क्षण आहे.”
हा खास भाग प्रेरणादायी कथा, महिला खेळाडूंची चिकाटी आणि भारताच्या क्रीडा प्रवासाचा गौरव करतो. हा भाग दाखवतो की, महिला खेळाडू कशा प्रकारे अडथळ्यांवर मात करत नवीन यशोशिखरे गाठत आहेत आणि लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत. कौन बनेगा करोडपती सीझन १७ मधून अमिताभ बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या दर्जेदार सूत्रसंचालनाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.