ठाणे : सगळीकडे गणेशोस्तवाची धूम सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय मात्र ठाणेकरांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे घरोघरी दीड दिवसांच्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी शहरात फिरत होते. संध्याकाळी त्यांचा ताफा घोडबंदर रोडवर आला असता त्यांना एक तरुणाची बाईक घसरून रस्त्याच्या कडेला बसलेला दिसला. शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवून गाडीतून उतरून या तरुणाची विचारपूस केली. त्यावेळी या तरुणाने आपली दुचाकी घसरल्याने आपल्या खांद्याला दुखापत झाल्याचे त्यांना सांगितले.
यावेळी त्यांनी तत्काळ आपल्या ताफ्यातील अँब्युलन्स पुढे घेत या तरुणाला त्यात घालून त्याला तत्काळ घोडबंदर रोडवरील होरायझन प्राईम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. तसेच आपल्या ताफ्यातील एक अधिकारी त्याची देखरेख करण्यासाठी दिला. घरोघरी श्री गणेशाचे आगमन झाले असल्याने विघ्नहर्ता घरोघरी विराजमान झाल्याची भावना लोकांमध्ये आहे. अशात जखमी तरुणाच्या मदतीला धावून जात उपमुख्यमंत्री शिंदे हेदेखील या तरुणासाठी खरे विघ्नहर्ता ठरले आहेत.