दुर्घटनेतील कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार – पालकमंत्री नाईक

0

पालघर : रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, इमारतीत राहणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड व वसई-विरार महापालिकेचे आयुक्त मनोज सूर्यवंशी यांचा अहवाल शासनाकडे सादर होणार असून, त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेतील कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.

वसई-विरार महापालिका मुख्यालय येथे पालकमंत्री गणेश नाईक यांनी रमाबाई अपार्टमेंट दुर्घटने बाबत प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपायोजनाचा आढावा घेतला. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार राजन नाईक, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, वसई विरार महापालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वसई-विरार महापालिका क्षेत्रातील रमाबाई अपार्टमेंटचा भाग कोसळून घडलेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर योग्य उपचार सुरू असून ते लवकरात लवकर बरे होतील, असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला .

वसई-विरार महापालिका क्षेत्रात सुमारे १४० इमारती धोकादायक असल्याचे लक्षात घेऊन या इमारतींतील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी म्हाडा मार्फत सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी बँका मार्फत कर्ज स्वरूपात वित्तपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नाईक यांनी सांगितले.

भविष्यात एकही अनधिकृत बांधकाम होऊ नये यासाठी महापालिका कठोर पावले उचलेल. जुन्या अनधिकृत इमारतींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, वसई विरार महापालिका प्रशासन, एन डी आर एफ, वैद्यकीय विभाग, पोलीस प्रशासन यांनी तात्काळ उपायोजना केल्याबद्दल पालकमंत्री नाईक यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech