काबुल : अफगाणिस्तानच्या दक्षिण-पूर्व भागात रविवारी (दि. ३१) रात्री जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.३ नोंदवली गेली. अहवालानुसार, या भूकंपामुळे २५० लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानसोबतच पाकिस्तानमध्येही भूकंपाचे झटके जाणवले.तसेच दिल्लीपर्यंतही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. युएसजीएसने सांगितले की भूकंपाचे केंद्र नंगरहार प्रांतातील जलालाबादजवळ होते आणि हे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागापासून ८ किलोमीटर खोल होते.
हा भूकंप रविवारी रात्री १२.४७ वाजता आला. सुरुवातीला ६.० तीव्रतेचा झटका जाणवला आणि त्यानंतर लगेचच ६.३ तीव्रतेचा दुसरा झटका बसला. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार रात्री ११:४७ वाजता आला. अफगाणिस्तानच्या नांगरहार आरोग्य विभागाचे प्रवक्ते नकीबुल्लाह रहीमी यांनी सांगितले की, भूकंपामुळे सुरुवातीला ९ लोकांचा मृत्यू झाला होता तर २५ जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र नंतर मृतांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आणि एकूण २५० लोकांचा जीव गेला. भूकंपानंतर अजूनही लोक भीतीमध्ये आहेत.
तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्टमध्ये म्हटले, ‘‘दुर्दैवाने, आज रात्री आलेल्या भूकंपामुळे आमच्या काही पूर्वेकडील प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. स्थानिक अधिकारी प्रभावित लोकांच्या बचाव कार्यात व्यस्त आहेत. केंद्र आणि आजूबाजूच्या प्रांतांतून मदत पथके देखील पोहोचत आहेत.’’ अफगाणिस्तानमध्ये याआधीही अनेक वेळा भूकंपाचे झटके जाणवले आहेत. २८ मे रोजी ४.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता. मात्र, त्यामध्ये कोणतेही नुकसान झाले नव्हते. त्याचबरोबर १६ एप्रिल रोजी ५.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता. यासोबतच भारत, नेपाळ आणि चीनमध्येही मागील काही महिन्यांत भूकंप झाले आहेत.
भारताने पुढे केला मदतीचा हात
अफगाणिस्तान पुन्हा एकदा एका शक्तिशाली आणि विनाशकारी भूकंपाने हादरले आहे. देशाच्या पूर्व भागात रविवारी (दि.३१) उशिरा रात्री आलेल्या या भूकंपाने प्रचंड हानी केली असून आत्तापर्यंत ८१२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शेकडो घरे मलब्याच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली असून सर्वत्र एक हतबल आणि भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकन भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षणानुसार, हा भूकंप रविवार (दि.३१) रात्री ११:४७ वाजता झाला आणि रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.३ इतकी होती. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून केवळ 8 किलोमीटर खोल होते, त्यामुळे हानीचे प्रमाण अधिक झाले.
पंतप्रधान मोदींकडून अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपाबद्दल शोक व्यक्त
रविवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात ८०० हून अधिक नागरित मृत्युमुखी पडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या या आपत्तीत झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल मी खूप दुःखी आहे असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, या कठीण काळात भारत शोकग्रस्त कुटुंबांसोबत उभा आहे आणि जखमींना लवकर बरे व्हावे अशी शुभेच्छा देतो. भारत अफगाणिस्तानातील बाधित नागरिकांना सर्वतोपरी मानवतावादी मदत आणि मदत करण्यास तयार आहे. भारत भूतकाळात नैसर्गिक आपत्तींदरम्यान आंतरराष्ट्रीय सहकार्यात आघाडीवर राहिला आहे आणि यावेळीही तो मागे राहणार नाही.