द्विपक्षीय बैठकीसाठी एकाच कारमध्ये एकत्र पोहोचले
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे शांघाय सहयोग संघटना (एससीओ) शिखर परिषदेच्या समारोपानंतर झालेल्या द्विपक्षीय बैठकीसाठी एकाच कारमध्ये बसून एकत्र पोहोचले. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर (एक्स) एक फोटो शेअर करत ही माहिती दिली. यासंदर्भातील ट्विटर पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले की, “एसओसी शिखर परिषदेनंतर मी आणि अध्यक्ष पुतिन एकत्र द्विपक्षीय बैठकीच्या स्थळी गेलो. त्यांच्यासोबतची चर्चा नेहमीच ज्ञानवर्धक असते.”ही भेट दोन्ही देशांमधील मजबूत राजनैतिक संबंधांचे प्रतीक आहे.
यापूर्वी दिवसभरात पंतप्रधान मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अध्यक्ष पुतिन यांच्यात अनौपचारिक संवाद झाल्याचे फोटो समोर आले, जे या शिखर परिषदेदरम्यान त्यांच्या सहज संवादाचे क्षण दर्शवतात. या फोटोंमध्ये तिघेही नेते हसताना आणि संवाद साधताना दिसत आहेत, जे रशियातील काझानमध्ये झालेल्या ब्रीक्स शिखर परिषदेच्या फोटोची आठवण करून देतात. ताज्या फोटोंमध्ये पुतिन डावीकडे, मध्ये पंतप्रधान मोदी आणि उजवीकडे शी जिनपिंग एकत्र चालताना एससीओ ‘फॅमिली फोटो’ साठी पोझ देताना दिसतात.
हा फोटो शेअर करताना पंतप्रधान म्हणाले की, “तियानजिनमध्ये भेटी सुरूच आहेत. एसओसी शिखर परिषदेदरम्यान अध्यक्ष पुतिन आणि अध्यक्ष शी यांच्याशी विचारांची देवाण-घेवाण केली.” पंतप्रधान मोदींनी एक आणखी फोटो शेअर केला, ज्यामध्ये ते आणि अध्यक्ष पुतिन हातमिळवणी आणि आलिंगन करताना दिसत आहेत. या फोटोसह मोदींनी लिहिले की, “अध्यक्ष पुतिन यांची भेट नेहमीच आनंददायी असते.”
याशिवाय, सोमवारी पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन यांना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या शेजारून जाताना पाहण्यात आले. त्या वेळी शरीफ एकटे उभे होते आणि थोडे उदास वाटत होते, तर मोदी आणि पुतिन अनौपचारिक चर्चेत व्यस्त होते. हा क्षण त्यावेळी घडला, जेव्हा एससीओ सदस्य देशांचे नेते तियानजिनमध्ये फोटो सेशनसाठी एकत्र आले होते.