नवीन जीएसटी स्लॅबमुळे क्रिकेट सामन्यांचे तिकिट दर वाढणार

0

नवी दिल्ली : नवी दिल्लीत जीएसटी कौन्सिलची ५६ वी बैठक झाली. या दरम्यान अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आता जीएसटीमध्ये फक्त दोन मुख्य स्लॅब असतील, ५% आणि १८%. पूर्वीचे १२% आणि २८% स्लॅब काढून टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर, लक्झरी आणि हानिकारक वस्तूंसाठी स्वतंत्र ४०% कर स्लॅब निश्चित करण्यात आला आहे. ही नवीन व्यवस्था २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू केली जाईल. अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही सुधारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे आणि सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी त्यात सहकार्य केले आहे.

या नवीन निर्णयाचा थेट परिणाम क्रिकेट चाहत्यांवर होणार आहे. आता आयपीएल सामने “लक्झरी अ‍ॅक्टिव्हिटी” मानले जातील आणि ४०% जीएसटी तयावर लावण्यात येणार आहे. पूर्वी त्यावर २८% कर होता. म्हणजेच स्टेडियममध्ये जाऊन आयपीएल पाहण्यासाठी प्रेक्षकांना जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. पण सध्या सामान्य क्रिकेट सामन्यांवर फक्त १८% जीएसटी लागू होणार आहे. याचा अर्थ हा बदल फक्त प्रीमियम क्रीडा स्पर्धांसाठी लागू होईल. भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या स्पोर्ट्स लीग प्रो कबड्डी लीगची तिकिटे देखील महाग होणार आहेत.

उदाहरणार्थ १,००० रुपयांच्या मूळ मूल्याच्या आयपीएल तिकिटावर पूर्वी २८% जीएसटी आकारला जात होता. ज्यामुळे त्याची अंतिम किंमत १,२८० रुपये झाली होतीे. आता, ४०% जीएसटी लागू झाल्यानंतर त्याच तिकिटाची किंमत १,४०० रुपये असणार आहे. म्हणजेच प्रत्येक १,००० रुपयांच्या तिकिटासाठी १२० रुपयांची वाढ होणार आहे. हेच सूत्र कायम ठेवून, ५,००० रुपयांच्या मूळ मूल्याच्या तिकिटाची किंमत आता ७,००० रुपये असेल. जी पूर्वी ६,४०० रुपये होती. दरम्यान, २००० रुपयांच्या तिकिटाची किंमत आता २,५६० रुपयांऐवजी २,८०० रुपये असणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech