नक्षल्यांच्यास दंडकारण्य समितीच्या सचिवपदी नियुक्तीची चर्चा
गडचिरोली : नक्षल चळवळीच्या नेतृत्वात मोठ्या फेरबदलांबाबत हालचाली सुरू आहे. कुख्यात नक्षलवादी कमांडर हिडमा मडावी याच्याकडे दंडकारण्य विशेष झोनल समितीच्या सचिवपदाची सूत्रे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही नेमणूक निश्चित झाल्यास, हिडमा हा या पदावर विराजमान होणारा पहिला गैरतेलगू नक्षलवादी ठरेल. माओवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (पीएलजीए) मधील बटालियन कमांडर म्हणून ओळख असलेल्या हिडमाची ही बढती नक्षली संघटनेतील महत्त्वाच्या डावपेचीय बदलाचे संकेत मानली जात आहे. या विषयावर अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुप्ततेच्या अटीवर माहितीला दुजोरा दिला आहे.
छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि तेलंगणा यांच्या सीमावर्ती भागात दंडकारण्य झोनमध्ये माओवादी चळवळीचा प्रभाव आजही कायम आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सुरक्षा यंत्रणांच्या सततच्या मोहिमा आणि कारवायांमुळे नक्षल गटांची ताकद ढासळत चालली आहे. एप्रिल २०२५ मधील ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ दरम्यान करेगुट्टा परिसरात ३१ माओवादी ठार झाल्याची नोंद आहे. यानंतर, मे २०२५ मध्ये अबुझमाडमध्ये झालेल्या चकमकीत माओवादी चळवळीतील वरिष्ठ नेता बसवराज उर्फ नंबाला केशव राव ठार झाला. या घटनांमुळे नक्षली नेतृत्वात अस्थिरता निर्माण झाली होती, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हिडमाच्या नियुक्तीची चर्चा सुरू झाली.
मूळचा छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबातील. शिक्षण केवळ सातवीपर्यंत, मात्र हिंदी आणि थोड्याफार इंग्रजी भाषेचे ज्ञान.PLGA मधील बटालियन कमांडर म्हणून दीर्घकाळ सक्रिय. शस्त्रास्त्र निर्मिती, स्फोटके लावणे आणि लढाईतील नेतृत्व यात प्राविण्य. सलवा जुडूम मोहिमेनंतर अधिक आक्रमक रूप. बस्तरमधील दुर्गम आदिवासी गावांमध्ये ‘रॉबिनहूड’सारखी प्रतिमा. मितभाषी, पण रणनीती आणि चकमकींमध्ये डावपेचात कुशल आहे.
नव्या नेतृत्वाचे संभाव्य परिणाम हिडमाच्या संभाव्य सचिवपदामुळे माओवादी चळवळ सशक्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष लढाऊ कारवायांत सक्रिय असलेला नेता आता संघटनेच्या धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत सहभागी होणार असल्याने, माओवादी हालचालींमध्ये नवीन रणनीती व दृष्टीकोन दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिडमाच्या नेमणुकीबाबत अद्याप नक्षली संघटनेकडून कोणतेही अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे या वृत्ताची पुष्टी अद्यापही प्रतीक्षेत आहे. मात्र, अशा नेमणुकीची चर्चा खुद्द सुरक्षा यंत्रणांमध्ये सुरु असून, पुढील काही दिवसांत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
 
								
				 
					
										
												
				 
	
											 
	
											