गैरसोईमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
नवी दिल्ली : शिक्षण संचालनालयाच्या नुकत्याच आलेल्या अहवालात दिल्लीतील ७९९ सरकारी शाळांमध्ये पाणी आणि वीज पुरवठ्याची अत्यंत खराब स्थिती उघड झाली आहे, जी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोठा धोका बनली आहे. अहवालानुसार, ७०३ शाळांपैकी ४८ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठाच नाही. ५९ शाळांमध्ये पाण्याचा पुरवठा अपुरा आणि अनियमित असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यापैकी २२ शाळा पूर्णपणे टँकरवर अवलंबून आहेत, तर १० शाळांमध्ये पाणी उपलब्धच नाही. यातील काही शाळा अजूनही बांधकामाच्या अवस्थेत आहेत, मात्र काही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून टँकर किंवा जवळच्या इतर शाळांवर अवलंबून आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, सरकारी शाळांची अवस्था शिक्षणाच्या दृष्टीने दिवसेंदिवस अधिकच ढासळत चालली आहे.
वीज पुरवठ्याच्या बाबतीतही स्थिती चिंताजनक आहे. तब्बल ६ शाळांमध्ये वीजच नाही, तर १७ शाळांमध्ये वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे शैक्षणिक कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. बहुतेक शाळांमध्ये ना जनरेटरची सोय आहे ना कोणतीही स्थायी पर्यायी व्यवस्था. काही शाळांमध्ये एकाच वीजमीटरचा वापर केला जात आहे, ज्यामुळे बिल भरणे व देखरेख करणे कठीण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने संबंधित उपशिक्षण संचालकांना तातडीने चौकशी करून सुधारात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. टँकरवर अवलंबून असलेल्या शाळांसाठी दिल्ली जल बोर्डाच्या माध्यमातून त्वरित टँकर पुरवठा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, ज्या शाळांना अद्याप जल बोर्डचे जलजोडणी कनेक्शन नाही, त्यांनी तातडीने नव्या कनेक्शनसाठी अर्ज करावा, असे आदेशही देण्यात आले आहेत.या समस्येचा कायमस्वरूपी उपाय म्हणून शाळांमध्ये सौरऊर्जेचे पॅनेल बसवण्याची शिफारसही करण्यात आली आहे, जेणेकरून भविष्यात अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये.