ट्रम्पशी चर्चा करण्यास मी उत्सुक – पंतप्रधान मोदी

0

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी माहिती दिली की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पुढील आठवड्यात व्यापार विषयक चर्चेसाठी बोलणार आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत म्हणाले कि, मला अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्याची उत्सुकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “एक्स”वर लिहिले की, भारत आणि अमेरिका हे घनिष्ठ मित्र आणि नैसर्गिक भागीदार आहेत. मला विश्वास आहे की आमच्यातील व्यापारविषयक चर्चा भारत-अमेरिका भागीदारीतील अमर्याद शक्यतांचे दार उघडेल. आमच्या टीम्स या चर्चेला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत. मला अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्याची उत्सुकता आहे.आपण दोन्ही देशांच्या लोकांसाठी एक उज्वल आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी एकत्र काम करू.

त्याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी “ट्रुथ सोशल” या प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारामध्ये असलेल्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी चर्चा सुरू आहे, ही गोष्ट सांगताना त्यांना आनंद होत आहे. ट्रम्प म्हणाले की, ते आपल्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी एक असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्याशी येत्या काही आठवड्यांत बोलण्यास उत्सुक आहेत. दोन्ही देशांमधील ही चर्चा सुरळीत पार पडेल आणि कोणतीही अडचण येणार नाही, याचा त्यांना विश्वास आहे. याला भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा होण्याच्या संकेत म्हणून पाहिले जात आहे.

ट्रम्प यांचे हे विधान द्विपक्षीय संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा दर्शवते. अमेरिका कडून टॅरिफ (शुल्क) लादणे आणि भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या तेलावरून दोन्ही देशांमध्ये गेल्या दोन दशकांतील सर्वात वाईट टप्पा गाठल्याचे मानले जात होते. ट्रम्प यांनी भारतावर २५% परस्पर शुल्क आणि रशियन तेल खरेदीसाठी अतिरिक्त २५% शुल्क लावले आहे. त्यामुळे भारतावर एकूण ५०% टॅरिफ लागू झाले आहे, जे जगातील सर्वाधिक आहे.भारताने अमेरिकेच्या या टॅरिफ शुल्कांना अन्यायकारक आणि विवेकहीन म्हटले आहे. रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीचे समर्थन करताना भारत म्हणाला आहे की, त्याची ऊर्जा खरेदी राष्ट्रीय हित आणि बाजारातील परिस्थितींवर आधारित आहे.

काही महिन्यांपासून भारतावर टीका केल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, दोन्ही देशांमध्ये “विशेष संबंध” आहेत आणि कसलाही धोका नाही. ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधील आपल्या ‘ओव्हल ऑफिस’मध्ये शुक्रवारी सांगितले की, “मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन. ते एक उत्कृष्ट पंतप्रधान आहेत, पण सध्या ते जे काही करत आहेत ते मला फारसे आवडलेले नाही. भारत आणि अमेरिका यांच्यात विशेष संबंध आहेत, काळजी करण्यासारखे काहीच नाही. फक्त कधी कधी असे काही क्षण येतात.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech