नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अकोला येथे २०२३ मध्ये झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरुवारी दिले. दंगली दरम्यान झालेल्या एका खून प्रकरणाचा प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा करणाऱ्या मोहम्मद अफजल मोहम्मद शरीफ याच्या विशेष परवानगी याचिकेवर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या संदर्भात आदेश देताना न्यायमूर्ती संजय कुमार आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने सांगितले की, एसआयटीमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. एकदा एखाद्या व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातला की, त्याने सर्व प्रकारच्या पूर्वग्रहांपासून (धर्म, जात इत्यादींवर आधारित) वेगळे होऊन कायद्यानुसार आपले कर्तव्य बजावले पाहिजे.
याचिकाकर्त्याचा दावा आहे की, दंगली दरम्यान त्याच्यावरही हल्ला झाला होता. या प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करण्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्याने आपला मुद्दा मांडण्यासाठी वाजवी वेळेत पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला नाही, या कारणास्तव उच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळून लावली होती. सर्वोच्च न्यायालयात मोहम्मद अफजलच्या वतीने युक्तिवाद करताना वरिष्ठ वकील अभय ठिपसे म्हणाले की, पोलिसांची कारवाई पक्षपाती होती आणि निष्पक्ष तपास झाला नाही. न्यायालयाने मान्य केले की अफजलला न्याय मिळाला पाहिजे आणि कोणताही भेदभाव न करता तपास करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. मे २०२३ मध्ये, अकोल्यात सोशल मीडियावर पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर जातीय हिंसाचार उसळला होता.
यामध्ये विलास महादेवराव गायकवाड यांचा मृत्यू झाला आणि तत्कालीन १७ वर्षीय याचिकाकर्ता मोहम्मद अफजल मोहम्मद शरीफ देखील जखमी झाला होता. याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, त्यांनी चार जणांना तलवार, लोखंडी पाईप आणि इतर शस्त्रांनी गायकवाडवर हल्ला करताना पाहिले. जेव्हा त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना मारहाणही करण्यात आली आणि त्यांचे वाहन जाळण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर, पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवले परंतु एफआयआर नोंदवण्यात आला नाही. दुसरीकडे, महाराष्ट्र पोलिसांचे म्हणणे आहे की, याचिकाकर्ता रुग्णालयात बोलण्याच्या स्थितीत नव्हता आणि त्यामुळे जबाब नोंदवण्यात आला नव्हता. पोलिसांनी खून प्रकरणाची चौकशी करून आरोपपत्र दाखल करत आरोपींकडून हत्येची शस्त्रे जप्त करण्यात आली होती.