नवनिर्वाचित उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी राज्यपालपदाचा दिला राजीनामा
नवी दिल्ली : सी.पी. राधाकृष्णन यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या जागी राष्ट्रपतींनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. आचार्य देवव्रत यांचा जन्म १८ जानेवारी १९५९ रोजी झाला. ते मूळचे हरियाणाच्या समलखा तहसीलचे (जि. पानिपत) रहिवासी आहेत. ते २०१९ पासून गुजरातचे २० वे राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी ते २०१५ ते २०१९ पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. ते आर्य समाजाचे प्रचारक आहेत आणि त्यांनी यापूर्वी कुरुक्षेत्र, हरियाणा येथील गुरुकुलाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे.
देवव्रत हे एक शिक्षणतज्ञ असून त्यांच्याकडे इतिहास आणि हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी, योग विज्ञानात पदविका आहेत. त्यांनी निसर्गोपचार आणि योगिक विज्ञानामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. त्यांनी वैदिक मानव मूल्ये आणि तत्वज्ञानावर व्याख्याने दिली आहेत आणि यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. तसेच, नैसर्गिक शेती आणि गोवंश सुधारणा याबाबत जागरूकता पसरविण्यासाठीही त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे.