नवी दिल्ली : दिल्लीच्या एका न्यायालयाने भारतीय नागरिकत्वाच्या प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना मोठा दिलासा दिला आहे. आज, ११ सप्टेंबर रोजी, सोनिया गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे. या याचिकेमध्ये असा आरोप करण्यात आला होता की, भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच सोनिया गांधी यांचे नाव १९८० च्या मतदार यादीत जोडण्यात आले होते. तसेच याप्रकरणी एफआयआर नोंदवावी, अशीही मागणी करण्यात आली होती. मात्र, राउज अॅव्हेन्यू कोर्टाने यावर निर्णय देताना स्पष्ट केले की, “हे सर्व आरोप आधारहीन आहेत. या प्रकरणात पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत आहे.”
या प्रकरणातील तक्रारदार विकास त्रिपाठी यांच्यावतीने ज्येष्ठ वकील पवन नारंग यांनी युक्तिवाद करताना म्हटले की,“खरा मुद्दा हा आहे की, जानेवारी १९८० मध्ये सोनिया गांधी यांचे नाव नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, तेव्हा त्या भारतीय नागरिक नव्हत्या. नागरिकत्वाच्या अटी पूर्ण केल्याशिवाय कोणीही मतदार होऊ शकत नाही.”
तक्रारदाराचा असा दावा होता की, सोनिया गांधी यांचे नाव १९८० मध्ये मतदार यादीत होते,पण 1982 मध्ये ते नाव हटवण्यात आले आणि १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर पुन्हा त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले. कोर्टाच्या या निर्णयानंतर काँग्रेस पक्षाने दिलासा व्यक्त केला आहे.तर दुसरीकडे, तक्रारदार पक्षाने सांगितले की, “या प्रकरणात पुढील कायदेशीर पर्यायांवर विचार केला जाईल.” हा निकाल राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जात असून, यामुळे सोनिया गांधी यांच्यावर असलेल्या पुरातन आरोपांना पूर्णविराम मिळाला आहे.