नारायणपूर येथे १६ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण
रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज, गुरुवारी चकमक झाली. यात १० माओवादी ठार झाले आहेत. दरम्यान राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यासंदर्भातील माहितीनुसार, ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये बालकृष्ण उर्फ मनोज याचा समावेश आहे, मनोजवर सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गरियाबंदच्या मैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलांमध्ये नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी संयुक्त ऑपरेशन राबवले. या मोहिमेत ई-३०, एसटीएफ आणि कोब्रा कमांडोंच्या टीम्स सहभागी होत्या. आतापर्यंत १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळी काही स्वयंचलित (ऑटोमॅटिक) शस्त्रास्त्रही सापडली आहेत.
दरम्यान नारायणपूर जिल्ह्यात आज, गुरुवारी १६ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. नारायणपूरचे पोलीस अधीक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी सांगितले की, माओवाद्यांची ‘पोकळ’ विचारधारा, निष्पाप आदिवासींवर केलेले अत्याचार, आणि संघटनेतील अंतर्गत मतभेद यामुळे निराश होऊन मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. हे सर्व माओवादी खालच्या स्तरावरील कार्यकर्ते होते. ते जनताना सरकार, चेतना नाट्य मंडळी आणि माओवादी पंचायत मिलिशिया यांसारख्या विविध युनिट्सशी संबंधित होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, जरी संघटनेतील त्यांची भूमिका निम्न स्तराची होती, तरीही त्यांनी नक्षल चळवळ जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.