बंगळुरू : कर्नाटकातील हसन तालुक्यातील मोसाले होसाहल्लीजवळ गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक जण जखमी झाले. हसनहून होलेनारसीपूरला जाणाऱ्या मिनी कॅन्टरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने आणि गणेश विसर्जन साजरा करणाऱ्या नागरिकांच्या मिरवणुकीला चिरडल्याने हा अपघात झाला. मोसाले होसाहल्ली आणि हिरेहल्ली येथील ग्रामस्थ गणेश विसर्जन मिरवणुकीत सामील झाले होते. अचानक एक कॅन्टर वाहन मिरवणुकीत घुसल्याने हा अपघात झाला. गंभीर जखमींना हसन आणि होलेनारसीपूरमधील सरकारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आणि या घटनेतील काही गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेवर दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आणि जखमींच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी सरकार उचलणार असल्याचे सांगितले आहे. या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करताना केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, ही बातमी ऐकून त्यांना धक्का बसला आहे आणि त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि जखमींना लवकर बरे होण्याची शुभेच्छा दिल्या आहेत.