प्रकाश महाजन यांचा मनसेला जय महाराष्ट्र

0

छत्रपती संभाजीनगर : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अखेर राजीनामा दिला असून त्यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षांतर्गत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावरून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. अखेर त्यांनी अधिकृतरीत्या मनसेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून याबाबत जाहीर माहिती दिली आहे.

त्यांनी म्हटले की, कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला निवडणुकीचा तिकीट मिळण्याची गरज नव्हती. कुठल्या पदाची गरज नव्हती. फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती. परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली. लोकसभेच्या रणधुमाळीत कधी मला विचारण्यात आलं नाही, विधानसभेच्या वेळी प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं. जी जी जबाबदारी माझ्यावर देण्यात आली ती मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. माझ्या कामाचं कौतुक नाही, मग माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाहीत त्याचे बोल मला लावण्यात आले. जे पाप माझ्याकडून घडले नाही त्याचे प्रायचित्त मला देण्यात आले. खरं म्हणजे मी फक्त अमित ठाकरे यांचा थोडा अपराधी आहे.

मी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत शब्द दिला होता, अमितजी मी तुमच्यासोबत आणि तुमच्या मुलासोबत देखील काम करेल. पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली. मी दिलेला शब्द पाळू शकत नाही. अमितजी तुम्ही मला समजून घ्याल असं वाटतंय. कधी कधी माणसाच्या क्षमतेप्रमाणे योग्य ते त्याला मिळत नाही. हा नशिबाचा मी एक भाग समजतो. असंख्य मनसैनिकांनी माझ्यावरती मनापासून प्रेम केलं. वेळोवेळी ते सर्वर्थाने माझ्यासाठी धावून आले. त्या सर्व मनसैनिकांचा मी कायमचा ऋणी राहील. पण मला असं वाटतं की आता आपण थांबलं पाहिजे. कुठेतरी या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आले पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला आहे, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.

या घडामोडीमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला याचा काय परिणाम होईल ते येणारा काळच ठरवेल. यानंतर पक्षाची काय भूमिका राहणार हेही पाहणे औत्सुक्याचे आहे. काही दिवसांआधी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी आपली खदखद बोलून दाखवत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. गंगेला बोल लावला तेव्हा खरतर मी तेव्हाच थांबायला हवं होतं, मला वैयक्तिक अपेक्षा नव्हती, पदाची अपेक्षा नव्हती, फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा ही अपेक्षा पण वाटेल उपेक्षा आली, असं म्हणत महाजन यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानं आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठा धक्का मानला जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech