मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिवाचा भक्त आहे, मी सर्व विष पचवतो- पंतप्रधान मोदी

0

दिसपूर : मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिवाचा भक्त आहे, मी सर्व विष पचवतो, असे विधान करत पंतप्रधान मोदींनी रविवारी (१४ सप्टेंबर) काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आसाम दौऱ्यावर आहेत. यावेळी दरांगमध्ये आयोजित जनसभेत ते बोलत होते. त्यांनी आज आसाममध्ये १८,५३० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले.

आसामच्या दरांगमध्ये आयोजित जनसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरनंतर मी प्रथमच आसाममध्ये आलो आहे. आई कामाख्येच्या आशीर्वादामुळे ऑपरेशन सिंदूरला प्रचंड यश मिळाले. त्यामुळे आज या पवित्र भूमीवर येऊन एक वेगळाच पुण्य अनुभव मिळत आहे. आज येथे जन्माष्टमी साजरी केली जात आहे. तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.”

पंतप्रधान म्हणाले, “मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिवाचा भक्त आहे. मी सर्व विष पचवतो. पण जेव्हा कोणाच्या आईचा, देशाच्या गौरवाचा अपमान होतो, तेव्हा ते मी सहन करू शकत नाही. पुढे ते म्हणाले, तुम्हीच मला सांगा की, भूपेनदांना भारतरत्न देण्याचा माझा निर्णय बरोबर होता की नाही? आणि काँग्रेसने त्यांचा केलेला अपमान बरोबर होता की चूक? आसामच्या अशा महान सुपुत्रांचे, आपल्या पूर्वजांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपची डबल इंजिन सरकार पूर्ण निष्ठेने काम करत आहे.”

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आम्ही आधीच भारतरत्न सुधाकंठ भूपेन हजारिका यांचा जन्मदिन साजरा केला आहे. काल मला त्यांच्या सन्मानार्थ आयोजित एका भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री यांनी मला काँग्रेस अध्यक्षाचा एक व्हिडीओ दाखवला आणि तो पाहून मला खूप दु:ख झाले. ज्या दिवशी भारत सरकारने या देशाच्या महान सुपुत्राला, असमच्या गौरवाला, भूपेन हजारिका यांना भारतरत्न दिला, त्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष म्हणाले होते, ‘मोदी गाणं-नाचणाऱ्यांना भारतरत्न देतोय.’”

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा देश दहशतवादी घटनांमध्ये रक्तबंबाळ होता. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी काँग्रेस पाकिस्तानच्या लष्करासोबत उभी राहिली होती. पाकिस्तानचे खोटे काँग्रेससाठी अजेंडा बनते.”पंतप्रधानांनी आरोप केला की काँग्रेसने मतबॅंकेच्या राजकारणासाठी योजनाबद्ध रीतीने घुसखोरी घडवून आणली. त्यांनी सांगितले की, असममधील हेमंता बिस्वा सरमा सरकारने लाखो एकर जमीन घुसखोरांपासून मुक्त केली आहे. “1962 साली चीनबरोबर युद्धानंतर पंडित नेहरू यांनी जे काही उत्तर पूर्व भारताबद्दल बोलले होते, त्याचे घाव आजही भरलेले नाहीत,” असंही मोदींनी नमूद केलं.

जनसभेत पंतप्रधानांनी लोकांना स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले, “तुम्ही जे काही विकत घ्याल, ते स्वदेशी असावे. कोणालाही गिफ्ट द्याल, तर ते ‘मेड इन इंडिया’ असावे. त्यात भारताच्या मातीतली सुगंध असायला हवी.” आसामच्या विकासावर भाष्य करत पंतप्रधान मोदी म्हणाले “आज भारत हा जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा देश आहे आणि आसाम हा भारतातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. एकेकाळी विकासाच्या गतीशी जुळवून घेण्यात संघर्ष करणाऱ्या असमने आता मोठा बदल केला आहे. आज असम 13% विकास दरासह उल्लेखनीय प्रगती करत आहे. ही प्रभावी उपलब्धी आसामच्या जनतेच्या जिद्द, मेहनत आणि समर्पणाचे प्रतीक आहे. हे यश भाजपच्या डबल इंजिन सरकारच्या योगदानामुळे आणि लोकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मिळाले आहे.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech