दिनेश गावडेच्या हत्येत एनआयएला हवा असलेल्या जहाल माओवाद्यास अटक

0

गडचिरोली : एका खुनाच्या गुन्हात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) पाहिजे असलेला,जाळपोळ व भुसुरुंग स्फोट आदी गुन्ह्यात सहभागी,दोन लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिसांनी तिरकामेटा परिसरातून अटक केली आहे. शंकर भिमा महाका (३२, रा. परायनार ता. भामरागड) असे अटक करण्यात आलेल्या माओवाद्याचे नाव आहे. १३ सप्टेंबर रोजी भामरागड उपविभागातील तिरकामेटा जंगल परिसरात विशेष अभियान पथकाची दोन पथके माओवादीविरोधी मोहीम राबवत होती. यावेळी त्यांना एक संशयित व्यक्ती जंगलात फिरताना दिसली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याची ओळख भामरागड दलमचा सक्रिय सदस्य शंकर भिमा महाका अशी पटली. माओवादी घातपातासाठी रेकी करत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

शंकर महाका हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक गंभीर गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, जाळपोळ आणि विध्वंसक कारवाया असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. त्याने केलेल्या काही प्रमुख गुन्ह्यांमध्ये: जाळपोळ (२०२२): धोडराज-ईरपनार मार्गावरील पेनगुंडा रस्त्याच्या कामावरील १९ वाहने जाळल्याच्या घटनेत सहभाग. या वाहनांचे अंदाजित मूल्य सुमारे २ कोटी रुपये होते. खून (२०२३): मौजा पेनगुंडा येथील एका निरपराध व्यक्तीच्या खुनात त्याचा थेट सहभाग होता. २०१६ पासून जनमिलीशिया सदस्य म्हणून सक्रिय असलेला शंकर महाका, २०२१-२२ पासून भामरागड दलमचा सदस्य बनला होता. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या अटकेनंतर सांगितले की, गडचिरोली पोलीस माओवादीविरोधी अभियान आणखी तीव्र करणार आहेत. त्यांनी माओवादी तरुणांना हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करण्याचे आणि सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दिनेश गावडेच्या खुनात एनआयएचा वाँटेड आरोपी लाहेरी येथील दिनेश पुसू गावडे या युवकाची १५ नोव्हेंबर २०२३ रोजी नक्षल्यांनी पेनगुंडा येथे धारदार शस्त्राने हत्या केली होती. याप्रकरणी धोडराज पोलिसांनी डोबा वड्डे, रवी पल्लो, सत्तू महाका व कोमटी महाका यांना अटक केली होती. पुढे ऑक्टोबर २०२४ मध्ये या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकेडे गेल्यानंतर त्यांनी चार जणांवर विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याच गुन्ह्यात आज अटक केलेला नक्षली शंकर भिमा महाका हा एनआयएला वाँटेड होता, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech