काही गोष्टी या खेळ भावनेच्या पलीकडच्या असतात – सूर्यकुमार यादव

0

अबुधाबी : कर्णधार सूर्यकुमारने नाणेफेकीदरम्यानही सलमान अली आघाशी हस्तांदोलन केले नाही. एवढेच नाही तर, पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीय क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे येताच भारतीय ड्रेसिंग रूमचा दरवाजा बंद करण्यात आला. हा प्रतीकात्मक बहिष्कार आता चर्चेचा विषय बनला आहे आणि भारतीय कर्णधार सूर्यकुमारनेही सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानला आरसा दाखवला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अखेर आशिया कप २०२५ च्या हाय-व्होल्टेज सामन्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करण्यास नकार देण्यावर आणि भारतीय ड्रेसिंग रूमचा दरवाजा बंद करण्यावर आपले मौन सोडले. रविवारी झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सने पराभूत केले. सामन्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी हस्तांदोलन केले नाही किंवा पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी बातचीतही केली नाही.

मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘आम्ही येथे खेळण्यासाठी आलो तेव्हा आम्ही एक संघ म्हणून निर्णय घेतला होता. आम्ही येथे फक्त खेळण्यासाठी आलो होतो. आम्ही मैदानावर योग्य उत्तर दिले. आम्ही बीसीसीआय आणि सरकारसोबत आहोत. मला वाटते आयुष्यातील काही गोष्टी या खिलाडू वृत्तीपेक्षा पलीकडे असतात. सामन्यानंतरच्या सादरीकरणात मीही हेच म्हटले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सर्व बळींच्या पाठीशी आम्ही उभे आहोत.’ भारतीय कर्णधार म्हणाला, ‘आम्ही पीडित कुटुंबांसोबत उभे आहोत आणि एकता व्यक्त करतो. मी म्हटल्याप्रमाणे, आम्ही हा विजय ऑपरेशन सिंदूरमध्ये भाग घेतलेल्या त्या शूर सैनिकांना समर्पित करतो. ज्याप्रमाणे ते आम्हाला प्रेरणा देतात, त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा आम्ही त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करू.’

दोन्ही देशांमधील तणाव शिगेला असताना हा सामना खेळवण्यात आला होता. एप्रिलमध्ये पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर मे महिन्यात भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई केली होती. या परिस्थितीत, सामन्यापूर्वी भारतात पाकिस्तानविरुद्ध खेळांवर बहिष्कार घालण्याची जोरदार मागणी करण्यात आली. दुसरीकडे पाकिस्तानचे प्रशिक्षक माइक हेसन यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणलेा, ‘आम्हाला हस्तांदोलन करायचे होते. पण विरोधी संघाने तसे केले नाही याबद्दल निराश आहोत. आम्ही आमच्या खेळावरही निराश आहोत. सामन्यानंतरच्या सादरीकरणाला सलमान न येणे हे त्याचेच परिणाम होते.’ क्रिकेट चाहते भारताचा हा विजय आणि हस्तांदोलन बहिष्कार हा भारताकडून मिळालेला स्पष्ट संदेश मानत आहेत. सोशल मीडियावर हा चर्चेचा मोठा विषय बनला आहे की, टीम इंडियाने केवळ विजय मिळवला नाही तर मैदानावर आणि मैदानाबाहेरही पाकिस्तानला योग्य उत्तर दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech