मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाला आठवड्यातून दुसऱ्यांदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला. शुक्रवारी सकाळी न्यायालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर हा संदेश पाठवण्यात आला होता. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने संपूर्ण परिसराची तपासणी करून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सकाळी ११ वाजता न्यायालयाचे नियमित कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. फोर्ट परिसरातील न्यायालयात सकाळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. बॉम्ब शोधक आणि निकामी पथक तसेच श्वान पथकाने संपूर्ण संकुल तपासून धोका नसल्याची खात्री दिली. प्राथमिक तपासात धमकीचा ईमेल बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाला मिळालेला हा दुसरा असा धमकीचा मेल आहे. यापूर्वी १२ सप्टेंबर रोजीही अशाच प्रकारे ईमेलद्वारे बॉम्बची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्या वेळी न्यायालय परिसर रिकामा करून सखोल तपासणीनंतर जेवणानंतरच्या सत्रात कामकाज पुन्हा सुरू झाले होते. त्या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दिल्ली उच्च न्यायालयालाही याच दिवशी रजिस्ट्रार जनरल आणि इतर अधिकाऱ्यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा संदेश आला होता. मुंबई पोलिस सायबर विभाग या प्रकरणाचा तपास करत असून मेल कोठून पाठवला गेला, याचा शोध घेत आहेत. सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सावध राहण्याचे आवाहन केले आहे.