पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले पिंडदान
पाटणा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज, शनिवारी बिहारमधील प्रसिद्ध मोक्षभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गया येथे पोहोचल्या. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व मोक्षप्राप्तीसाठी विधीपूर्वक पिंडदान केले. राष्ट्रपती खास विमानाने गया आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्या. विमानतळावर त्यांचे स्वागत बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी केले. त्यानंतर रस्ता मार्गाने विष्णुपद मंदिरात गेल्या. पिंडदानासाठी विष्णुपद मंदिराच्या परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत विशेष व्यवस्था करण्यात आली होती आणि सुरक्षेचे कडक बंदोबस्त करण्यात आला होता. गयापाल पुरोहित राजेश लाल कटरियाल यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक पद्धतीने कर्मकांड पार पाडण्यात आले. राष्ट्रपतींनी सर्व विधी-विधानांनुसार पिंडदान केले. त्यांच्या आगमनानिमित्त मंदिर परिसर व आसपासच्या भागात विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
दरवर्षी पितृपक्षात हजारो भाविक गयेजी येथे येतात आणि सनातन धर्माच्या परंपरेनुसार आपल्या पितरांच्या मोक्षासाठी व शांतीसाठी पिंडदान करतात. येथे विष्णुपद मंदिर, फल्गू नदी, अक्षयवट आणि इतर अनेक पवित्र स्थळी वेदिक पद्धतीने पूजा-अर्चा केली जाते. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा या भौतिक जगातच भटकत राहतो अशी धारणा आहे. फक्त शरीर नष्ट होतं, आत्मा मात्र अमर असतो. परिवाराने पिंडदान केल्यास आत्म्याला या लोकातून मुक्ती मिळते आणि तो बंधनमुक्त होतो. पितृपक्षाच्या निमित्ताने देश-विदेशातून हजारो भाविक गया येथे पिंडदानासाठी येतात. भाविक व पिंडदानी यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासन व पर्यटन विभागामार्फत व्यापक तयारी करण्यात आली आहे. गया येथे रविवार २१ सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष मेळा सुरू राहणार आहे.