छत्तीसगड : येथील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांने नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून, त्यांच्याकडून हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या अबूझमाड परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांना नक्षलविरोधी मोहिमेसाठी पाठवण्यात आले होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दल क्षेत्रात पोहोचताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला, आणि त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले.
या चकमकीनंतर घटनास्थळाची झडती घेत असताना दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह, एके-४७ रायफल, अन्य हत्यारे, स्फोटके, प्रचार साहित्य, आणि दैनंदिन वापराच्या वस्तू सापडल्या आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, आणि तपास मोहिम अद्याप सुरूच आहे. मोहिम पूर्ण झाल्यानंतर अधिक सविस्तर माहिती देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.