मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः उच्छाद मांडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत, तर मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. बळीराजाच्या चिंतेत अधिक भर टाकणारी बाब म्हणजे हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून त्याचा परिणाम थेट महाराष्ट्रावर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भाग, मध्य महाराष्ट्र तसेच कोकण विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टी किंवा ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. कोकण विभागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे नेहमी दुष्काळग्रस्त समजला जाणारा मराठवाडा यंदा पुराच्या विळख्यात सापडला आहे. काही तासांतच १०० ते २०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्याने नदी-नाले तुडुंब भरले आहेत. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश स्थिती निर्माण झाली असून लाखो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. लातूर, बीड, परभणी, औरंगाबादसारख्या जिल्ह्यांत पावसाने हाहाकार माजवला आहे. विशेष म्हणजे ज्याठिकाणी पूर्वी रेल्वेने पाणी पुरवावे लागले होते, त्याच मराठवाड्यात आज दुप्पट-तिप्पट पाऊस होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, या पावसामागे हवामान बदल हे एक महत्त्वाचे कारण आहे. गेल्या काही वर्षांत तापमानातील अनियमितता, पर्जन्यमानातील तफावत आणि पर्यावरणीय असंतुलनामुळे अशा अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. निळ्या आणि हिरव्या क्षेत्रांची घट, झाडांची होणारी तोड आणि पाणथळ जागांचे नष्ट होणे यामुळे पावसाचे पाणी साठवले न जाता पुरस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील विद्यापीठे व शेती महाविद्यालयांनी एकत्रित संशोधन करणे, पर्यावरणस्नेही नियोजन करणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करणे अत्यावश्यक ठरत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील विद्यमान परिस्थितीमुळे नागरिकांसमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. नवरात्रोत्सव सुरू असताना संध्याकाळी बाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून संभाव्य धोका लक्ष्यात घेऊन नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सूचित करण्यात आले आहे.
राज्यातील परिस्थितीवरून हे स्पष्ट होते की, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाचा फटका सर्वाधिक प्रमाणात शेतकऱ्यांना बसत आहे. आधीच झालेल्या नुकसानीवर पावसाचा इशारा मिळाल्याने त्यांच्या चिंतेत प्रचंड वाढ झाली आहे. राज्याला सतत त्रास देणारे हे अस्मानी संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त होत असून, पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरणार आहेत.