नवी दिल्ली : दिल्लीच्या वसंतकुंज भागात प्रसिद्ध आश्रम चालवणारे संचालक स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्याच्यावर सुमारे १७ विद्यार्थिनींशी विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करून वसंतकुंज (नॉर्थ) पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, स्वामी चैतन्यानंद सरस्वती सध्या फरार असल्याचं समजतं आहे. फरार व्यक्तीचे नाव चैतन्यानंद सरस्वती ऊर्फ पार्थसारथी आहे. त्यांच्या वापरात असलेल्या वॉल्वो कारमध्ये बनावट राजनैतिक क्रमांक 39 UN 1 आढळून आले आहे. ही गाडी आता पोलिसांनी जप्त केली आहे. प्रकरण नोंदवल्यानंतर आश्रम प्रशासनाने संबंधित व्यक्तीला पदावरून हटवले आहे.
दिल्ली पोलिस आरोपी चैतन्यानंद सरस्वतींच्या शोधासाठी अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. सध्या त्यांची शेवटची लोकेशन आग्रा येथे मिळाली असून, उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने शोध सुरू आहे. दुसरीकडे, पीडित विद्यार्थिनींचे जबाब देखील नोंदवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी वसंतकुंज नॉर्थ पोलिस ठाण्यात श्री शृंगेरी मठ आणि त्याच्या संपत्तींचे प्रशासक पी. ए. मुरली यांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती ऊर्फ पार्थसारथी विरोधात तक्रार दाखल केली होती. शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटमध्ये इडब्ल्यूएस स्कॉलरशिप अंतर्गत पीजीडीएम करणाऱ्या विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचे आरोप लावले होते.
पोलिसांनी चौकशी दरम्यान ३२ विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले, ज्यापैकी १७ विद्यार्थिनींनी आरोपी चैतन्यानंद सरस्वतींकडून शिवीगाळ, अश्लील व्हॉट्सअॅप मेसेज, एसएमएस आणि गैरप्रकार करण्याचे आरोप लावले. पीडितांनी हेही सांगितले की, कॉलेजमध्ये फॅकल्टी/अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करणाऱ्या महिलांनी देखील त्यांच्यावर मागण्या मान्य करण्यासाठी दबाव टाकला. पोलिसांनी तपासादरम्यान श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटच्या बेसमेंटमध्ये एक वॉल्वो कार उभी असल्याचे आढळून आले. तपासात स्पष्ट झाले की ३९ UN 1 या बनावट राजनैतिक क्रमांकाच्या प्लेटसह ही कार कथित स्वामी चैतन्यानंद सरस्वती ऊर्फ डॉ. स्वामी पार्थसारथी वापरत होते. पोलिसांनी त्याला अनेक वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं, परंतु कधीही सहकार्य केलं नाही आणि सध्या फरार आहेत.