वॉशिंग्टन : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८०व्या सत्राच्या निमित्ताने जगभरातील आपल्या समकक्ष परराष्ट्र मंत्र्यांसोबत अनेक द्विपक्षीय बैठकीमध्ये भाग घेतला. या बैठकीत द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक घडामोडी आणि जागतिक संघर्ष यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. जयशंकर यांनी आपल्या सोशल मीडियावर या बैठकींबाबत माहिती शेअर केली आहे. जयशंकर यांनी नेदरलँड्सचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड वॅन वील यांच्यासोबत युरोपमधील धोरणात्मक परिस्थिती आणि भारताच्या दृष्टीकोनावर सखोल चर्चा केली. त्यांनी डेन्मार्कचे परराष्ट्र मंत्री लार्स लोके रासमुसेन यांच्याशीही भेट घेतली. यावेळी त्यांनी युरोपमधील अलीकडील घडामोडी आणि सुरू असलेल्या युक्रेन संघर्षावर त्यांच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले. दोन्ही मंत्र्यांनी डेन्मार्कच्या अध्यक्षतेखाली युरोपीय संघ परिषदेबरोबर भारताचे द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य यावर चर्चा केली.
श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांच्यासोबत द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री रितेश रामफुल यांच्याशी झालेल्या चर्चेत, मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्या भारत दौऱ्यानंतरच्या पुढील कारवाईबाबत चर्चा झाली.मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील यांच्याशी झालेल्या बैठकीत भारताने मालदीवच्या विकासासाठी आपला पाठिंबा कायम असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. लेसोथोचे परराष्ट्र मंत्री लेजोन मपोटजोआना, सूरीनामचे मेल्विन बौवा, सोमालियाचे अब्दिसलाम अली, सेंट लूसियाचे अल्वा बॅप्टिस्ट आणि जमैकाची कामिना जे. स्मिथ यांच्याशी झालेल्या वेगवेगळ्या बैठकीतही द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली.जयशंकर यांनी जमैकाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून कामिना स्मिथ यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि भारत-जमैका भागीदारी अधिक मजबूत करण्याची आशा व्यक्त केली.
समान विचारसरणी असलेल्या ‘ग्लोबल साउथ’ देशांच्या उच्चस्तरीय बैठकीत जयशंकर यांनी सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विवियन बालाकृष्णन यांच्याशी संवाद साधला.जयशंकर यांनी दुबईस्थित आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स कंपनी डीपी वर्ल्डचे ग्रुप चेअरमन आणि सीईओ सुलतान अहमद बिन सुलेयम यांच्याशीही भेट घेतली आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील सध्याच्या घडामोडी, संपर्क व पुरवठा साखळी यावर यांचा होणारा परिणाम यावर चर्चा केली.
जयशंकर यांनी युरोपियन संघाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या अनौपचारिक बैठकीतही सहभाग घेतला, ज्याचे आयोजन युरोपीय संघाच्या परराष्ट्र व सुरक्षा धोरणाच्या उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांनी केले होते. जयशंकर म्हणाले की, या बैठकीने “बहुपक्षीयता, भारत-युरोपीय संघ भागीदारी, युक्रेन संघर्ष, गाझा, ऊर्जा आणि व्यापार” यावर मोकळेपणाने विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी दिली.परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर २७ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार आहेत.