वडेट्टीवारांची भावना चांगली, पण नैसर्गिक संकटावेळी राजकारण अयोग्य
नागपूर : राज्यातील नैसर्गिक संकट मोठे असून यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकार त्यांना मदत देणारच आहे आणि यात काही शंका नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांना मदत देण्याचे ठोस आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. सध्याची परिस्थिती राज्यातील कुठल्याच शेतकऱ्यांवर ओढवू नये. सध्याच्या प्रसंगात सर्वच जण आपापल्या परीने मदत करत आहेत. परंतु सध्याची परिस्थिती गंभीर आणि नाजूक आहे. ती हाताळताना सर्वांनाच काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. आज नागपूर दौऱ्यावर आलेल्या चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सध्या महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. शेतीत काहीच शिल्लक ठेवले नाही. सर्व वाहून गेले आहे. त्यामुळे महायुती सरकारने तातडीने सर्व स्थानिक अधिकाऱ्यांना नुकसानीची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वतः मंत्री आणि आमदारही गावोगावी जात आहेत. वडेट्टीवारांची भावना चांगली, पण नैसर्गिक संकटावेळी राजकारण करणे अयोग्य आहे. भाजपाच्या सर्व आमदार आणि खासदारांनी एका महिन्याचे पूर्ण वेतन आपत्तीग्रस्तांना देण्याचं ठरविलं आहे. अशावेळी वडेट्टीवारांनी सहा महिन्यांचे वेतन द्यायचे ठरवले असले, तर त्यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र राजकारण म्हणून या सगळ्या गोष्टी करणे योग्य नाही. कारण लोकप्रतिनिधींना प्रवास भत्त्यासाठी वेतन मिळत असते.
ग्रामीण भागातील आमदारांना सातत्याने फिरावे लागते आणि भेटीगाठी घ्याव्या लागतात. त्यामुळे वडेट्टीवारांची भावना चांगली असली तरी अशा प्रसंगी त्यांनी राजकारण करणे योग्य नाही. काही लोकप्रतिनिधी प्रचंड गडगंज असतात, मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना प्रवास भत्ता अपुरा पडतो. त्यामुळे त्यांना इतर कामांसाठी स्वतः व्यवस्था करावी लागते, अशी प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे. उलटसुलट वक्तव्य करणे सर्वांनीच टाळले पाहिजे. राजकारण आणि कुरघोडी करण्याची, ही वेळ नाही, असे आवाहनही चव्हाण यांनी शेवटी केले.